बुलेट ट्रेनच्या खर्चाची कोटींची उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:14 AM2020-08-22T03:14:46+5:302020-08-22T07:02:44+5:30
गेल्या तीन वर्षांत एक लाख १० हजार कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च आठ ते दहा टक्के अर्थात आठ ते दहा हजार कोटींनी वाढल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
नारायण जाधव
ठाणे : आधीच पर्यावरणप्रेमींच्या विरोधासह भूसंपादनातील अडथळ्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प तीन वर्षांपासून रखडत चाललेला असताना आता त्यापुढे कोविडचे जागतिक संकट उभे राहिले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत एक लाख १० हजार कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च आठ ते दहा टक्के अर्थात आठ ते दहा हजार कोटींनी वाढल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ग्लोबल समिटमध्येही रेल्वेमंत्र्यांसह बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे मान्य करून याबाबत त्यास अर्थसाहाय्य करणाºया ‘जायका’ कॉर्पोरेशनसोबत कोणत्याही नव्या वाटाघाटी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
>यामुळे वाढला खर्च
जागांचे वाढलेले भाव, जपानी येन व रुपयाच्या विनिमयदरात वाढलेला फरक, सिमेंट, स्टीलसह इतर कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि कोविडमुळे मनुष्यबळाची निर्माण होणारी कमतरता, कराव्या लागणाºया आरोग्यविषयक उपाययोजना, या कारणांमुळे हा खर्च वाढला आहे. यामुळे एप्रिल २०२० मध्ये बांधकामास सुरुवात होऊन तो डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे स्वप्न लांबणीवर पडणार आहे.
>हे आहेत अडथळे : सुमारे ५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. मात्र, यासाठी लागणाºया १४३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन हा महत्त्वाचा अडथळा ठरला आहे. याशिवाय, बुलेटट्रेन ठाणे खाडीखालून जाणार असून राज्यातील एकमेव फलेमिंगो अभयारण्यासह पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर अभयारण्यास क्षती पोहोचणार असल्याने पर्यावरणप्रेमींचा तीस विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेले असतानाच आता कोविडचे जागतिक संकट उभे राहिल्याने प्रकल्प लांबणीवर पडून त्याचा खर्च वाढत चालला आहे.
>बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच एकूण खर्चाबाबत बोलणे, हे अधिक उचित ठरेल. आता त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तसेच एकूण कर्ज आणि त्याच्या मुख्य अटी व शर्तींबाबत ‘जायका’सोबत कोणत्याही वाटाघाटी करण्यात येणार नाहीत. कोरोना महामारीमुळे या प्रकल्पावर काम करणाºया मनुष्यबळावर काय परिणाम झाला हे सांगणे वा त्यांच्या उपलब्धतेबाबत अंदाज वर्तविणे आता कठीण असून सध्या चालू असलेली कामे मात्र नियमित सुरू आहेत.
- सुषमा गौर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, कॉर्पोरेट कम्युनिकेशन,
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन