बुलेट ट्रेनला भारतातील विरोध चुकीचा - मिजोकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:49 AM2017-11-30T06:49:23+5:302017-11-30T06:49:36+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे.
ठाणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे. मात्र, त्या बुलेट ट्रेनला भारतातच होणारा विरोध चुकीचा आहे. बुलेट ट्रेनमुळे व्यापार वाढीस लागेल. दळणवळण अधिक सुखकर होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असे मत जपानच्या ओसाका विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रोफेसर डॉ. तोमिओ मिजोकामी यांनी व्यक्त केले.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने जपान-भारत संबंध इतिहास आणि संदर्भ या विषयावर मिजोकामी यांचे व्याख्यान कात्यायन सभागृहात सोमवारी सायंकाळी पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. सध्या ते भारत दौºयावर असून यादरम्यान भारतातील विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठांना भेटी देऊन जपान-भारत संबंध या विषयावर हिंदी, जापनीज, बांगला आणि पंजाबी या चार भाषांमधून व्याख्याने देणार आहेत. त्यांच्या या उपक्र माचा शुभारंभ त्यांनी ठाण्यातून केला. भारत हा जपानसाठी आदर्श सांस्कृतिक देश आहे. या दोन्ही देशांचे अनेक काळापासून चांगले संबंध राहिलेले असून या दोन्ही देशांनी अनेक स्थित्यंतरेही पाहिलेली आहेत. तर, सध्याचे संबंध पाहता भविष्यात हे दोन्ही देश एका नव्या उंचीवर पोहोचतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेनबद्दल बोलताना २०२३ नंतर त्याच बुलेट ट्रेनने मुंबई-अहमदाबाद असा प्रवास करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर अध्यक्षस्थानी होते. अनंत अडचणींवर मात करून प्रगती कशी करावी, हे जपानकडून शिकण्यासारखे आहे. जपानने आर्थिक, शैक्षणिक व तंत्रविज्ञान क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली आहे. भारताचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.