बुलेट ट्रेनच्या मार्गातील माती भिवंडी, नवी मुंबईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:24 AM2018-08-07T05:24:36+5:302018-08-07T05:24:46+5:30
मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान सुमारे ५०८.१० किलोमीटर बुलेट ट्रेन धावणार आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान सुमारे ५०८.१० किलोमीटर बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गातील माती, गाळ, दगडांचे शेकडो ट्रक निघणार आहेत. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडी तालुक्यातील दापोडे गावाजवळील जागेसह नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराजवळील जासई गावचे मोकळे माळरान प्रस्तावित केले आहे.
मुंबईसह ठाणे परिसरात मेट्रो, बुलेट ट्रेन आणि नवघर ते चिरनेर मल्टिकॉरिडॉर आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी सध्या जमीन संपादनाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ठाणे जिल्ह्यातून ३९.६६ किलोमीटर धावणार आहे. या प्रकल्पासाठी तयार होणाºया मार्गातील माती, दगड मोठ्या प्रमाणात निघणार आहे. त्यांची विल्हेवाट लावणे प्रकल्प व्यवस्थापकांची डोकेदुखी ठरणार आहे. त्यावर, वेळीच उपाययोजना म्हणून भिवंडी तालुक्यातील दापोडे परिसरातील सर्व्हे क्रमांक ११५ च्या मोकळ्या जागेतही या मातीचा भराव होईल.
सध्या बुलेट ट्रेनसाठी आवश्यक १९ हेक्टर शेतजमीन मोजमापाचे काम सुरू आहे. यामध्ये ठाणे तालुक्यातील १९ गावांमधील २५० शेतकºयांची शेती आहे. या १०४ प्लॉट्सचे संपादन भूमिअभिलेख विभाग करत आहे. शीळ, डावले, पडले, आगासन, बेतवडे, लहानी देसाई, मोठी देसाई या गावांमधील शेती व सरकारी जमिनींचे मोजमाप सुरू आहे. बीकेसीतून ठाण्यात येणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ, आगासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघर जिल्ह्यातून अहमदाबादला जाईल. या मार्गातील दगड, मातींचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन बुलेट ट्रेन प्रशासनाने आधीच केले आहे.
>मेट्रोसह कॉरिडॉरचेही काम
मुंबई व ठाणे शहर परिसरांत निघणाºया माती व दगडांची विल्हेवाट लावणे तसे जिकिरीचे आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भिवंडीच्या नऊ हेक्टर जागेवर या मातीचा भराव होईल. याशिवाय, जेएनपीटीच्या जासई गावाजवळील मोकळ्या भूखंडावर या मातीचा भराव करण्याचे नियोजन आहे, असे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.पी. सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासह मेट्रो आणि विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर या प्रकल्पांचे काम आम्ही एकाच वेळी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे एकमेकांच्या प्रकल्पांतून निघणारे दगड, मातीही महामार्गांचे रस्ते, रेल्वेची भरावकामे, कॉरिडॉर महामार्गासाठी वापरणार आहे. त्यासाठी एकाच वेळी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.