बुलेट ट्रेनसाठी रुग्णालय, शाळा, पोलीस स्टेशनचा बळी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:20 AM2019-06-15T05:20:11+5:302019-06-15T05:20:27+5:30
आरक्षण बदलाचा प्रस्ताव महासभेत : शिवसेनेची मवाळ भूमिका
ठाणे : बुलेट ट्रेनच्या मुद्यावर राज्य पातळीवर शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी युती झाल्याने शिवसेनेने आता मवाळ भूमिका घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागे ज्या प्रस्तावाला शिवसेनेने केराची टोपली दाखविली होती, त्याच बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला आता अनुमती दर्शवत हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणला गेला आहे. या बुलेट ट्रेनसाठी १९.४९ हेक्टर जमीनीचे भूसंपादन आणि म्हातार्डी येथे स्थानकासाठी १७.१३ हेक्टर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. यामध्ये ठाणे महापालिकेचा ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशन महापालिकेची हौसिंगची योजना, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, हॉस्पिटल अशी विकास आराखड्यातील विविध आरक्षणे बाधित होणार आहेत. त्यानुसार या आरक्षणांच्या फेरबदलाचा महत्वाचा प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्टÑवादीची मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बुलेट ट्रेन ही ठाणे महापालिका हद्दीतील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. येथील भूखंड संपादीत करण्याबाबत यापूर्वी आदेश झालेले आहेत. या भूखंडांच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार मंजूर नकाशात ठाणे महापालिका हद्दीतील आखणीची लांबी ही १११३५. ०० मीटर एवढी असून, रुंदी १७.५० मीटर धरण्यात आली आहे.
त्यानुसार १९.४९ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. म्हातार्डी येथे स्थानक उभारले जाणार असल्याने त्यासाठी १७.१३ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. यामुळे ठाणे महापालिकेची येथील विविध आरक्षणे बाधित होणार आहेत. यामध्ये काही आरक्षणांना जास्त, तर काही आरक्षणांना कमी प्रमाणात फटका बसणार आहे.
दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये हा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सादर करुन महापौरांकडे पाठविला होता. मात्र शिवसेनेने सुरूवातीपासूनच बुलेट ट्रनेच्या विरोधात भूमिका घेतली असल्याने हा प्रस्ताव पटलावर आणलाच नव्हता. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपने एकमेकांबरोबर घरोबा केला आहे. त्यामुळेच आता बुलेट ट्रनेच्या आरक्षण बदलांचा प्रस्तावही महासभेत मंजुरीसाठी घेण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे.
अशी होणार आरक्षणे बाधित
या आरक्षण फेरबदलानुसार सेक्टर १० मधील प्रस्तावित लोकोशेड -२ चे आरक्षणाचे क्षेत्र हे १५.०० हेक्टर असून, त्यातील ४.०६ टक्के आरक्षण बाधित होणार आहे. येथील १०.९४ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महापालिका प्राथमिक शाळेच्या ०.६० हेक्टर क्षेत्रापैकी ०.००७२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.५१ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. रिक्रिएशन ग्राऊंडचे १.१९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.४१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ०.७८ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. बसस्थानक, प्रभाग कार्यालय आणि हॉस्पिटलचे अनुक्रमे ०.२८, २.४० आणि २.४० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०५, ०.३० आणि ०.०३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, अनुक्रमे ०.२०, २.१० आणि २.३७ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.
दुसरीकडे सेक्टर ११ मधील प्रस्तावित सिव्हरेज ट्रिटमेंट प्लॅन्ट, पंपीग स्टेशनच्या ०.५० हेक्टरच्या आरक्षणापैकी ०.११ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, ०.३९ हेक्टर आरक्षण शिल्लक राहणार आहे. म्युनिसिपल हाऊसिंगच्या ४.२५ हेक्टर क्षेत्रापैकी ०.१५ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून, ४.१० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. महाविद्यालयाच्यह १.८१ हेक्टर क्षेत्रापैकी ०.३१ हेक्टर बाधित होणार असून १.५० हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. प्रस्तावित दहनभूमिचे १.०८ हेक्टर आरक्षणापैकी ०.६ हेक्टर बाधित होणार असून १.०२ हेक्टर शिल्लक राहणार आहे. महानगरपालिकेने विविध सार्वजनिक उद्देशांसाठी राखीव ठेवलेल्या ०.७३ हेक्टर क्षेत्रापैकी ०.५१ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून केवळ ०.२२ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे. पोलीस स्टेशनच्या ०.३९ हेक्टर क्षेत्रापैकी ०.०६ हेक्टर क्षेत्र बाधीत होणार असून ०.३३ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहणार आहे.
शिवसेना आता या प्रस्तावाच्या बाजूने असली तरी राष्टÑवादीचा या प्रस्तावाला सुरवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत धरण्याची आयती संधी राष्टÑवादीला मिळणार आहे. त्यामुळे सेनेचे नगरसेवक आता काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.