कामचुकारांना दणका
By admin | Published: January 22, 2016 02:10 AM2016-01-22T02:10:15+5:302016-01-22T02:10:15+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १७ कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त ई.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १७ कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी दुसऱ्यांदा अशी धडक कारवाई केली आहे. याआधी दांडीबहाद्दर आरोग्य निरीक्षकासह २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. गुरूवारी केलेल्या कारवाईत कल्याणमधील अ आणि क तर डोंबिवलीतील ह प्रभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीला कल्याण डोंबिवली शहरात फेरीवाला विरोधी आणि अनधिकृत बांधकामावरील कारवाईची विशेष मोहीम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग क्षेत्र अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके गठीत करून त्यांना विशिष्ट जबाबदारी दिली आहे. परंतु, काही कर्मचारी कामात हयगय व निष्काळजीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर आयुक्तांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई केल्याचे सामान्य प्रशान विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांनी सांगितले. यात क प्रभागातील प्रभाकर घेंगट, वसंत सोळंकी, दीपक जाधव, राहुल भालेराव, मंगल भालके, शाम कारभारी, राजू शिलवंत, सदाशिव मढवी, जनन लोखंडे, गोवर गोस्वामी यांच्यासह अ प्रभागातील अनंता गंगावणे, कृ ष्णा घनघाव, दादासाहेब निकाळजे, अनिलकुमार वाल्मिकी तर ह प्रभागातील महेश सोळंकी, जयहिंद पालकरी, संतोष धनगर या कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फेरीवाले हटविणे,अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे याचबरोबर अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढणे आदी कामांमध्ये हयगय केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवला आहे.
काही काळापूर्वी आयुक्तांनी ब प्रभागातील हजेरी शेडला भेट दिली होती. तेथे सफाई कामगार कामावर हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी २४ जणांवर निलंबन कारवाईचा बडगा उगारला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी १७ जणांवर कारवाई केल्याने कामचुकारपणा कराल, तर कारवाई अटळ असल्याचा संदेशच त्यांनी कृतीतून दिला आहे. (प्रतिनिधी)