डोंबिवलीत भाजपाच्या आधारकार्ड शिबिराला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 05:02 PM2018-01-10T17:02:10+5:302018-01-10T17:04:29+5:30
डोंबिवली: आधारकार्ड साठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील दोन बँकांव्यतिरीक्त कुठेही आधारकार्ड केंद्र नाही त्याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनूसार पंडीत दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था व भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन १० ते १२ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सुरु झाले. त्याचा शुभारंभ बुधवारी राज्यमंत्री चव्हाण यांनी केला.
सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत वेळेत एव्हरेस्ट हॉल, म. गांधी मार्ग डोंबिवली पश्चिम येथे ही सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक भाजपाचे पश्चिम मंडल अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी दिली. आधार कार्ड नोंदणीसाठी, नवीन नोंदणी/दुरु स्ती असे विविध सुविधा तेथे उपलब्ध असतील.मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या सुविधेसाठी ५ यंत्र ठेवण्यात येणार असून एकाचवेळी १५० नागरिकांची सोय होणार असल्याचे प्रभुघाटे म्हणाले. पूर्व नोंदणीसाठी नागरिकांनी बाळकृष्ण अपार्टमेंट, सी विंग, पिहला मजला, घन:श्याम गुप्ते मार्ग, डोंबिवली (पश्चिम) असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी स्वतंत्र विविध रंगांचे बॅजेस नोंदणी केलेल्या नागरिकांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रथम येणा-याला प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याने शहरासह पंचक्रोशीतील कोणीही नागरिक येवो त्यांची गैरसोय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कोणताही गोंधळ न होता सुटसुटीत पद्धतीने उपक्रम यशस्वी झाल्याची माहिती प्रभुघाटे यांनी दिली. त्यावेळी भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, ज्येष्ठ नेते जूने डोंबिवलीकर पद्माकर कुलकर्णी, पूर्व मंडलाचे सरचिटणीस सुरेश पुराणिक आदींसह मान्यवर उपस्थित होते.