नगरसेवकांच्या हट्टापायी ठामपा तिजोरीवर ४८ कोटींचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:05+5:302021-07-03T04:25:05+5:30
ठाणे : महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही शिक्कामोर्तब होत नसल्याने आता आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील ...
ठाणे : महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही शिक्कामोर्तब होत नसल्याने आता आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामे करण्यासाठी नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार आहे. मागील महासभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निधी मिळावा यासाठी नगरसेवकांनी बोंबाबोंब केल्यानंतर कोरोनाचे संकट असतानाही आता पहिल्या टप्प्यात प्रभाग सुधारणा निधी प्रत्येकी २५ लाख आणि नगरसेवक निधी ११ लाख दिला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
यामुळे प्रभागातील अडकलेली विकास कामे मार्गी लागणार असली तरी पालिकेच्या तिजोरीवर यामुळे ४८ कोटींचा बोजा पडणार आहे. आधीच कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर संकट ओढावले आहे, त्यात नगरसेवकांच्या हट्टापायी तिजोरीला फटका बसणार आहे.
सध्या तिजोरीत अवघे ७६ कोटी शिल्लक आहेत. हा निधी कोरोनाच्या अत्यावश्यक कामांसाठी राखीव ठेवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा यासाठी मागील महिन्यात झालेल्या महासभेत आणि त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी आगडोंब केला होता. प्रभागातील नागरिकांना आम्ही काय तोंड दाखवायचे, असा सवालही केला होता. त्यानुसार महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी नगरसेवकांना नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी टप्याटप्याने दिला जाणार असल्याचे सांगितले होते. तसेच इतर कामांसाठी कर्ज काढण्याचा विचारही सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या काही वर्षांपासून उशिराने मंजूर होत असल्यामुळे नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून सातत्याने होत आहे. त्यात पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्याआधी ही कामे झाली नाहीतर नगरसेवकांची डोकेदुखी वाढू शकते. यातूनच ते सातत्याने हे दोन्ही निधी देण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत.
मात्र, आता कोरोना संकटामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही नगरसेवकांच्या आग्रहानंतर नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. परंतु, उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्याने प्रशासनाने दोन्ही निधीला कात्री लावण्याचा विचार सुरु केला आहे. यापूर्वी नगरसेवक निधी ४० ते ४५ लाख आणि प्रभाग सुधारणा निधी ५० ते ६० लाख रुपये इतका मिळत होता. त्यात कपात करून नगरसेवक निधी ११ लाख तर प्रभाग सुधारणा निधी २५ लाख दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तो जाणार असून टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यातही या निधीतून प्रभागातील केवळ अत्यावश्यक कामे करावीत असेही सांगण्यात आले आहे.