धुळ्याचा सराईत चोरटा बदलापूरात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:44 PM2018-08-21T21:44:55+5:302018-08-21T22:05:06+5:30
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात घरफोडी करणाऱ्या कैलास मोरे या सराईत चोरटयाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिटच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल असून त्यातील आठ गुन्हयांची उकल झाली आहे.
ठाणे : अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरात घरफोडी करणा-या कैलास मोरे (३८, रा. सोनगीर, जि. धुळे)या सराईत चोरट्यालाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील हत्यारांसह साडेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
उल्हासनगर परिमंडळ ४ मधील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात घरफोडी करणाºया सराईत चोरट्याची माहिती उल्हासनगर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. तिच्या आधारे त्याला सापळा रचून १० आॅगस्ट रोजी बदलापूर पश्चिमेकडील एसटी स्टँडजवळील गांधी टेकडी येथून त्यांच्या पथकाने अटक केली. त्याने सिद्धीविनायक पार्क, बेलवली, बदलापूर पश्चिम या भागात दिवसाही चो-या केल्याची कबुली दिली. तो त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने कारने येऊन दिवसा बंद घराचे कुलूप तोडून रेकी करुन चोरी करायचा. त्याच्याकडील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागातील चोरीचे आठ गुन्हे उघड झाले आहेत. यात चोरीला गेलेल्या तीन लाख ४० हजार किंमतीच्या ११३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख १० हजारांची गुन्ह्यात वापरलेली कार आणि हत्यारे असा साडेपाच लाखांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला आहे. त्याच्यावर नालासोपारा, वसई, एमएचबी, बोरीवली, कस्तुरबा मार्ग, चारकोप, कुरार, पंतनगर , घाटकोपर, सिल्वासा आणि अहमदाबाद येथे घरफोडीचे ३२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यातही दरोड्याच्या तयारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो आर्थर रोड आणि धुळे मध्यवर्ती करागृहातून बाहेर आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले हे करीत आहेत.