दफनविधी साहित्याचे दर समाजमाध्यमावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 12:20 AM2019-08-04T00:20:02+5:302019-08-04T06:51:17+5:30
मृतांच्या नातेवाइकांची होतेय लूट; विक्रेत्याने लढविली शक्कल
- कुमार बडदे
मुंब्रा : मृतदेह दफन करण्यासाठी, तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या मृताच्या आप्तस्वकीयांची विक्रेत्यांकडून अनेकदा लूट होते. ती थांबावी, यासाठी एका विक्रेत्याने दफनविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर चक्क समाजमाध्यमावर व्हायरल केल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.
मृत व्यक्तीच्या अंतिम विधी (मृतदेह दफन करणे किंवा अंत्यसंस्कार करणे) साठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करताना मृताचे आप्तस्वकीय तसेच मित्रपरिवाराची धावपळ होते. घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असताना, दु:ख बाजुला सारुन नातलगांना अंत्यविधीच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी पायपीट करावी लागते. हे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेली व्यक्ती त्यावेळी दराच्या बाबतीत घासाघीस करण्याच्या मन:स्थितीमध्ये नसते. नेमक्या याच संधीचा लाभ घेवून, अंत्यविधीच्या साहित्याची विक्री करणारे काही विक्रेते अवाजवी दर आकारुन लोकांची लूट करतात. विक्रेत्यांकडून पैसे तर जास्त घेतलेच जातात, शिवाय त्यामोबदल्यात साहित्यही चांगल्या दर्जाचे दिले जात नाही. बरेचदा खराब झालेल्या साहित्याची विक्री करताना हे विक्रेते दिसून येतात. अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मुंब्रा येथील सरफराज दरबारी यांनी शक्कल लढवली. त्यांनी दफनविधी व अंत्यसंस्कारासाठी लागणाºया साहित्य विक्रीचे दर समाजमाध्यमावर व्हायरल केले. सोशल मीडियावर बहुतेक जण सक्रिय असतात. त्यांच्यापर्यंत अंत्यविधीच्या साहित्याचे योग्य दर पोहोचावेत, त्यांची लूट थांबावी, हा उद्देश असल्याचे सरफराज दरबारी यांनी लोकमतला सांगितले.
सरफराज यांनी व्हायरल केलेल्या पोस्टनुसार अत्यंत नाममात्र दरात दफनविधीसाठी लागणाºया तीन चटया, गुलाबपाणी, १८ मीटर कापड, कापूस, मृतदेहाला अंघोळ घालण्यासाठी साबण, सुईधागा, अत्तर आदी साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्रा व परिसरात दफनविधीचे साहित्य विकणाºया काही दुकानांत अवाच्या सव्वा दराने या साहित्याची विक्री होत असल्याने गोरगरीब मुस्लिम कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.