भिवंडीत तीन यंत्रमाग कारखाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:21+5:302021-03-07T04:37:21+5:30
भिवंडी : शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांत आग लागण्याच्या दहा घटना ...
भिवंडी : शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांत आग लागण्याच्या दहा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तीन यंत्रमाग कारखाने जळून खाक झाले.
शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास नारपोली सोनीबाई कंपाउंड येथील सोल्जर या अत्याधुनिक यंत्रमाग असलेल्या कारखान्यात आग लागली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केल्याने एकूण तीन कारखाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, त्यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या ज्वाळा उंचच उंच गेल्याचे दिसत होते. या तिन्ही कारखान्यांचे सिमेंट पत्र्याचे छत कोसळून येथील सर्व यंत्रमाग, तयार व कच्चा कपडा जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. कारखान्यापर्यंत जाणारा रस्ता अरुंद असल्यान अग्निशमन दलाची गाडी तेथपर्यंत पोहचू शकली नाही. शेजारील एका कारखान्याच्या भिंतीस भोक पाडून आग लागलेल्या कारखान्यातील आग विझविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दरम्यान, आगीचे कारण अस्पष्ट असून या घटनेची भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
.........
वाचली