ठाण्यात पुन्हा बर्निंग कार! धावत्या कारला लागली आग; सलग दुसरी घटना
By अजित मांडके | Published: July 18, 2023 12:00 PM2023-07-18T12:00:08+5:302023-07-18T12:00:32+5:30
ही बाब लक्षात येतात, पुराणिक यांनी गाडी रस्यावर उभी केली, पण आगीने काही क्षणात रुद्र रूपधारण केल्याने त्या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला बसली
ठाणे - नाशिककडून मुंबईला सोमवारी सकाळी निघालेल्या धावत्या कारला आग लागल्याची घटना ताजी असताना, घोडबंदर रोडने वागळे इस्टेटकडे निघालेल्या धावत्या कारने घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नल समोर पेट घेतल्याची मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या अन्य एका कारला बसली आहे. एकीकडे पाऊस पडत असताना, त्या भर पावसात दुसऱ्या धावत्या कारने पेट घेतल्याचे समोर येत आहे. अशाप्रकारे ठाण्यातील चोविस तासातील ही दुसरी घटना आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र पेट घेतलेली कार जळून खाक झाली आहे.
मानपाडा येथील संजय पुराणिक हे मंगळवारी सकाळी मानपाडा येथून वागळे इस्टेट येथे जात असताना, घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलवर येताच अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. ही बाब लक्षात येतात, पुराणिक यांनी गाडी रस्यावर उभी केली, पण आगीने काही क्षणात रुद्र रूपधारण केल्याने त्या आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला बसली . या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्यानंतर त्या आगीवर जवळपास दहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत पुराणिक यांची कार जळून खाक झाली असून आनंद गुप्ता यांच्या कारला आगीची झळ लागल्यामुळे त्या कारचे फायबर मेल्ट होऊन किरकोळ नुकसान झाले आहे. आग लागली तेंव्हा पुराणिक हे एकटेच प्रवास करत होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.