सापासाेबत भिवंडी ते कल्याण बस प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:02+5:302021-07-28T04:42:02+5:30
कल्याण : शहापूर बसडेपोतून राज्य परिवहन महामंडळाची बस कल्याणच्या दिशने निघाली असता चालकाच्या केबिनमध्ये साप आढळल्यामुळे चालक-वाहक आणि बसमधील ...
कल्याण : शहापूर बसडेपोतून राज्य परिवहन महामंडळाची बस कल्याणच्या दिशने निघाली असता चालकाच्या केबिनमध्ये साप आढळल्यामुळे चालक-वाहक आणि बसमधील प्रवासी भयभीत झाल्याची घटना मंगळवारी घडली. बस कल्याण डेपोत येताच सर्पमित्राच्या मदतीने सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले.
शहापूर ते कल्याण ही बस भिवंडीमार्गे येते. बस कुठे तरी रात्री उभी असताना रात्री साप बसमध्ये आश्रयाला आल्याची शक्यता नाकारता येत नाही. बस शहापूर डेपोतून निघाली. राहुल कलाने हे या बसचे चालक होते. बसने शहापूर ते भिवंडीपर्यंतचा पल्ला निर्धोक गाठला. बस भिवंडी डेपोत आली, तेव्हा बसमध्ये आधी काही प्रवासी होते. त्यानंतर आणखीन प्रवासी चढले. बसने भिवंडी सोडताच केबिनमध्ये साप असल्याचे कलाने यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब वाहकास सांगितली. त्यावेळी वाहकाने प्रवाशांनाही सूचित केले की, घाबरून जाऊ नका. बसमध्ये साप आला आहे. यानंतर चालक-वाहकाने कल्याण बसडेपोत संपर्क साधला. कल्याण बसडेपोचे व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क साधला. बोंबे यांनी कोणीही घाबरू नका. गाडी थेट कल्याण डेपोत आणा, असे सांगितले. गाडी येण्यापूर्वीच बोंबे बसडेपोत पोहाेचले. त्याठिकाणी गाडीतला साप गाडीतील पत्र्याच्या कोनाड्यात जाऊन बसला होता. कार्यशाळेतील वेल्डरने गाडीचा पत्रा कापून तेथे लपलेला साप सर्पमित्रास दाखविला असता बोंबे यांनी त्याला पकडले. हा साप बिनविषारी टस्कर जातीचा होता. त्याला जंगलात सोडून देण्यात आले आहे.
फोटो-कल्याण-साप
-----------------