उल्हासनगर पालिकाच सुरू करणार बससेवा
By admin | Published: December 29, 2015 12:56 AM2015-12-29T00:56:39+5:302015-12-29T00:56:39+5:30
खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्यानंतर आता महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षी पाच बस खरेदी करून ही परिवहन
- सदानंद नाईक, उल्हासनगर
खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्यानंतर आता महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षी पाच बस खरेदी करून ही परिवहन सेवा सुरू केली जाईल. नंतर, दरवर्षी पाच बस खरेदी करून सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल, असा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर खाजगी ठेकेदारामार्फंत धूमधडाक्यात परिवहन बससेवा सुरू केली होती. तिकीट दरवाढीवरून पालिका आणि ठेकेदारात तू तू मैं मैं झाल्यावर बससेवा ठेकेदाराने बंद केली. दरम्यानच्या काळात पालिकेच्या हद्दीअंतर्गत बससेवा सुरू करण्याची मागणी राजकीय पक्षांसह सिंधू फं्रट संघटनेने केली आणि त्यासाठी आंदोलने केली, उपोषणे केले.
तत्कालीन महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या प्रयत्नांमुळे केडीएमटीच्या मदतीने शहरातील मुख्य सात मार्गांवर बससेवा सुरू झाली. मात्र, नंतर त्या बसही दिसेनाशा झाल्यावर पालिकेने स्वत: परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी सेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अधिकारी धीरज ठाकूर यांनी लावून धरली.
जुन्या कामगारांना सामावून घ्या
महापालिकेने खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्याने त्यातील शेकडो कामगार बेकार झाले. त्या कामगारांना पालिका परिवहन सेवेत सामावून घेण्याची मागणी कामगार संघटनेचे नेते अरुण आशान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.