कसारा-थड्याचापाडापर्यंत सुरू झाली बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:06+5:302021-03-05T04:40:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : शहापूर तालुक्यातील कोठारेमधील थड्याचापाडा हे ७५ घरांच्या आदिवासी लोकवस्तीचे अतिदुर्गम गाव. या गावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : शहापूर तालुक्यातील कोठारेमधील थड्याचापाडा हे ७५ घरांच्या आदिवासी लोकवस्तीचे अतिदुर्गम गाव. या गावात वाहन जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात टँकरही जात नव्हता. या गैरसोयींबाबत ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या गावासाठी डांबरी रस्ता व गावापर्यंत बससेवा सुरू व्हावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून थड्याचापाडा ग्रामस्थांसाठी प्रयत्न सुरू केले. वर्षभरात रस्त्याचा प्रश्न सुटला, पण एसटीची सेवा सुरू करण्यासाठी महावितरणच्या तारांचा अडथळा येऊ लागला. मात्र, हाही प्रश्न निकाली लागल्याने बुधवारी कसारा ते थड्याचापाडापर्यंत बस सोडण्यात आली.
बस वाहतुकीसाठी एसटी महामंडळाने सर्वेेक्षण केले असता महावितरणची उच्चदाबाची वाहिनी बसला लागत असल्याने अपघाताची शक्यता होती. परिणामी, बससेवा सुरू होणार नसल्याचा अहवाल महामंडळाकडून देण्यात आला. या प्रकरणी बरोरा यांनी महावितरणचे अभियंता अविनाश कटकवार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी सहकार्य करण्याची विनंती केली. कटकवार यांनी थड्याचापाडा येथे जाऊन त्यांनी बससेवेसाठी अडथळा ठरणाऱ्या वीजवाहक तारा तत्काळ उंचावर करून घेतल्या. बुधवारी एसटी महामंडळ अधिकाऱ्यांसमवेत जाऊन बससेवा सुरू करण्यासाठी बरोरा यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सर्वेक्षण केले. बसफेरीची एक चाचणीही घेण्यात आली. त्यावेळी बस सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे दिसून येताच कोळीपाडा येथे येणाऱ्या बसफेऱ्या या थड्याचापाडापर्यंत नियमित सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार, थड्याचापाडा ते कसारा बस सुरू झाली. या बसचा प्रारंभ बरोरा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, एकनाथ भला, संदीप थोराड आदी उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळ : कसारा ते थड्याचापाडापर्यंत सुरू झालेल्या बससेवेचे उद्घाटन करताना माजी आमदार पांडुरंग बरोरा.