डोंबिवली-कल्याण रेल्वे समांतरमार्गे बस लवकरच
By admin | Published: June 27, 2017 03:06 AM2017-06-27T03:06:52+5:302017-06-27T03:06:52+5:30
ठाकुर्लीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण-डोंबिवली
अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाकुर्लीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याणदरम्यान रेल्वे समांतर मार्गाने मिडी बस सोडल्या. या बसच्या दिवसभरातील १११ फेऱ्यांमुळे केडीएमटीला दीड लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या सेवेमुळे प्रवाशांनी समाधान मानल्याने आता लवकरच या मार्गावरून कायस्वरूपी बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दरम्यान, रविवारी या मार्गाची चाचणी झाल्याची चर्चा आहे.
कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर मार्गामुळे या दोन्ही शहरांचे अंतर कमी झाले आहे. शिवाय वेळ व इंधनाची बचत होणार असल्याने या मार्गाने कायमस्वरूपी बससेवा सुरू करणार असल्याची माहिती केडीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी ‘लोकमत’ला दिली. अन्य मार्गांवरही बस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याआधी सध्या अंतिम टप्प्यात असलेली वाहकांची भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ती झाल्यानंतर तातडीने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
मेगाब्लॉकमुळे रविवारी कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे हजारो प्रवाशांनी रिक्षांऐवजी केडीएमटीच्या बससेवाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरून या बस सुटल्याने प्रवासी समाधानी होते. रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजण्यापेक्षा बसने कमी पैशात आणि कमी वेळेत प्रवास करण्याला प्रवाशांनी जास्त पसंती दिली. या प्रवासादरम्यान या मार्गावर कायमस्वरूपी सेवा देण्याची मागणी प्रवाशांनी केली. त्यावर केडीएमटी प्रशासनाने लवकरच बसेसवा सुरू करणार असल्याचे सांगितले.
पूर्वेकडील राथ रोड, भाजी मार्केटमार्गे ठाकुर्ली, रेल्वेसमांतर रस्ता, पत्री पूलमार्गे कल्याण या मार्गाने बस चालवण्याचे नियोजन असल्याचेही सभापती संजय पावशे म्हणाले. परिवहन सेवा नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याने ही सेवा कायम व्हावी, तातडीने सुरू करावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.