भाईंदरच्या चौक गावातील बस स्थानकाचे नाव अखेर 'बांगलादेश' ऐवजी झाले 'इंदिरा नगर'
By धीरज परब | Published: June 21, 2023 03:53 PM2023-06-21T15:53:02+5:302023-06-21T15:53:20+5:30
चौक गाव हे मच्छीमारांचे गाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक गावातील एका बस स्थानकास बांग्लादेश असे तेथील प्रचलित झोपडपट्टीचे नाव दिल्या प्रकरणी खासदार राजन विचारेंसह स्थानिक माजी नगरसेवकांनी विरोध केल्यावर महापालिकेने अखेर त्या बस स्थानकाचे नाव बदलून इंदिरा नगर असे केले आहे.
चौक गाव हे मच्छीमारांचे गाव आहे . ह्या गावाच्या बाहेरच्या बाजूला १९९५ साली ठाणे जिल्हा परिषदेने इंदिरा आवास योजने अंतर्गत अल्पभूधारकांना १५ घरे बांधून दिली होती . तर १९९३ साली लातूर जिल्ह्यातील भूकंपा नंतर १५ ते ३० ते बेलदार (वडार ) समाजाची कुटुंबे येथील सरकारी जागेवर झोपड्या बांधून राहू लागली होती . सरकारी जागा असल्याने हळूहळू कर्नाटकच्या गुलबर्गा भागातून काही लोक आले तर काही मुस्लिम कुटुंबही स्थायिक झाले.
मात्र ह्या झोपडपट्टीला बांगलादेश असे नाव प्रचलित झाले . त्या प्रचलित नवा प्रमाणेच घरांचे पत्ते व पालिका आदींच्या नोंदी सुद्धा बांगलादेश असा उल्लेख सुरु झाला . मध्यंतरी बांग्लादेश नाव प्रचलित झाल्याच्या संदर्भात मुद्दे उपस्थित झाले. परंतु प्रशासनाने फारसे गांभीर्य दाखवले नाही .
नुकतेच महापालिकेने येथील बस थांब्यास बांग्लादेश असे नाव दिल्याने टीका सुरु झाली . मनसेने फलक तोडून काळे फसले . तर माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, जॉर्जी गोविंद आदींनी सदर बाब खासदार राजन विचारे यांच्या कडे मांडली . खा . विचारे यांनी बस स्थानकाचे नाव बदलण्यासह महापालिका आणि शासकीय नोंदीतून देखील बांग्लादेश हा उल्लेख वगळून इंदिरा गांधी नगर अशी नोंद करून घेण्याची मागणी केली . तसे पत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदींना दिले . मंगळवारी महापालिकेकडून चौक येथील बस स्थानकास इंदिरा नगर असे नाव असलेला फलक लावला आहे . पालिका व शासकीय नोंदींतून देखील बांग्लादेश हा उल्लेख बदलण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे शर्मिला बगाजी यांनी सांगितले .