बिझनेस हबसाठी २०२८ साल?
By admin | Published: January 18, 2016 02:07 AM2016-01-18T02:07:26+5:302016-01-18T02:07:26+5:30
कल्याण बिझनेस हब होण्यासाठी २०२८ साल उजाडणार आहे, असे साऊथ कोरिअन सरकारच्या थिंक टँकनेच म्हटले आहे. कल्याण ग्रोथ सेंटरची व त्यासाठी लागणाऱ्या
मुरलीधर भवार, कल्याण
कल्याण बिझनेस हब होण्यासाठी २०२८ साल उजाडणार आहे, असे साऊथ कोरिअन सरकारच्या थिंक टँकनेच म्हटले आहे. कल्याण ग्रोथ सेंटरची व त्यासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केलेली आहे. तीन टप्प्यांत कल्याण शहर हे बिझनेस हब म्हणून नावारूपाला येऊ शकते. मुंंबईखेरीज संभाव्य बिझनेस हबच्या पाच शहरांच्या यादीत कल्याणला प्राधान्य दिले आहे.
साऊथ कोरिअन सरकारच्या थिंक टँकच्या अभ्यास गटाने यापूर्वीच केलेल्या अभ्यासानुसार कल्याणमध्ये विकासाला भरपूर वाव आहे. मुंबईबाहेरच्या शहरांमध्ये कल्याण प्रथम प्राधान्याने बिझनेस हब म्हणून उदयाला येऊ शकते. कल्याणच्या पाठोपाठ वसई- विरार, भिवंडी, पनवेल आणि पेण-अलिबाग या शहरांचा नंबर लागणार आहे. ही पाच शहरे बिझनेस हब होऊ शकतात. त्यासाठी ५६ हजार ६७६ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. कल्याण हे मुंबई कर्जत-कसारा रेल्वेमार्ग व मुंबई-पनवेल रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे. या दृष्टीने भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता महत्त्वाचा आहे. दोन राज्य महामार्ग आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्प होऊ घातला आहे. तसेच केंद्र सरकारचा डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर हा मालगाड्यांच्या विशेष वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग दिल्ली ते जेएनपीटी बंदर असा आखला जात आहे. त्याच्या भूसंपादनाचे काम जवळपास होत आले आहे.
२७ गावे ही कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यापैकी १९ गावे कल्याण तालुक्यातील तर सात गावे अंबरनाथ तालुक्यातील आहेत. या २७ गावांची लोकसंख्या २ लाख ९१ हजार आहे. ६७ हजार घरे आहेत. १ हजार ७७ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. त्यात खाजगी, सरकारी कार्यालये, संग्रहालय, सिनेमागृह, बिझनेस, शॉपिंग मॉल, हॉटेल, हेल्थ केअर, मार्केट, ग्रंथालय यांचा समावेश असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. विरार-अलिबाग मल्टी कॉरिडॉर, दोन राज्य महामार्ग आणि मोनोरेल हे महत्त्वाचे प्रकल्प असल्याने त्यांच्याकरिता जमीन संपादित करावी लागणार आहे. बाजारभावाप्रमाणे जमीन संपादनासाठी ३५ हजार कोटी व नुकसानभरपाईपोटी १० हजार कोटी रुपये लागणार आहे.
जमीन संपादन व नुकसान भरपाईचा आकडा हा ५६ हजार ६७६ कोटींमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे ५६ हजार ६७६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातून ही गुंतवणूक अपेक्षित आहे. कल्याण ग्रोथ सेंटर नावारूपाला येऊन बिझनेस हब होण्यासाठी २०२८ साल उजाडणार आहे कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये कोळेगावानजीक सेंट्रल बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. कल्याण बिझनेस हबची संकल्पना बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.