लोखंडी सळ्यांचा धंदा जोरात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:29 AM2020-11-22T01:29:53+5:302020-11-22T01:30:26+5:30
पोलिसांशी हातमिळवणी करून धंदा होत असल्याचा आरोप
वाडा : वाडा-भिवंडी महामार्गावरून लोखंडी सळ्या, अँगल्स यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या लोखंडी सळया, अँगल्स उतरवून काही जण अनधिकृतपणे हा धंदा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांशी हातमिळवणी करूनच हा धंदा केला जात असल्याचा आरोप होत आहे.
वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोखंडाचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. या कंपन्यांतून तयार होणाऱ्या सळया, अँगल्स यांची वाहतूक मुंबईच्या बाजारपेठेत होऊ लागली. भिवंडी-वाडा महामार्गावरून लोखंडाची वाहतूक होत असताना गाड्यांचे चालक विविध ढाब्यांवर गाड्या थांबवतात.
लोखंडी सळ्यांचा धंदा करणारे अशा चालकांशी हातमिळवणी करून गाडीतील दोनचार लोखंडी सळ्यांचे बंडल उतरवून घेतात. लोखंडी सळ्या घेऊन जाणारी अशी शेकडो वाहने दिवसातून जातात. त्यामुळे सध्या हा धंदा तेजीत असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी या सळ्या विकत घेऊन पहाटेच्या सुमारास त्या विकून त्याची विल्हेवाट लावली जाते. सळ्यांचे एक बंडल दोन ते अडीच हजारांना विकत घेऊन तेच तीन ते साडेतीन हजारांना विकले जाते.
तालुक्यातील काही लोखंडविक्रेते तसेच बांधकाम व्यावसायिक हा माल विकत घेऊन आपल्या कामासाठी वापरतात. याबाबतची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वाड्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी दिली.