केडीएमटी ई-तिकिट प्रणालीला खीळ
By admin | Published: May 1, 2017 05:59 AM2017-05-01T05:59:00+5:302017-05-01T05:59:00+5:30
कोट्यवधी रूपयांच्या थकबाकीमुळे एकीकडे बसच्या देखभाल-दुरूस्तीवर परिणाम झाला असताना दुसरीकडे लाखोंच्या थकबाकीप्रकरणी
कल्याण : कोट्यवधी रूपयांच्या थकबाकीमुळे एकीकडे बसच्या देखभाल-दुरूस्तीवर परिणाम झाला असताना दुसरीकडे लाखोंच्या थकबाकीप्रकरणी ई-तिकिट प्रणाली राबविणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीनेही सेवा देताना टाळाटाळ करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे तूर्तास ई-तिकिट प्रणालीला काहीअंशी खीळ बसल्याने जुन्या पेपर-तिकिटांचा आधार घेण्याची वेळ केडीएमटीवर आली आहे.
केडीएमटीत २०१२ सालापासून ई-तिकिट प्रणाली लागू झाली आहे. राज्य परिवहन, नवी मुंबई महापालिका परिवहन आणि बेस्टमध्ये ई-तिकिट प्रणाली राबविणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीला याचे कंत्राट दिले आहे. पाच वर्षासाठी देण्यात आलेल्या या कंत्राटाची मुदत मे २०१७ पर्यंत म्हणजेच पुढच्या महिन्यापर्यंत आहे. या ई-तिकिट प्रणालीच्या माध्यमातून वेळ, वाहकाचे नाव, तिकिटाचे मूल्य, कोणत्या मार्गासाठी तिकिट काढले आहे याची माहिती प्रवाशाला मिळत होती. परंतु सद्यस्थितीला थकित बिलांमुळे कंत्राटदार सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याने तूर्त या ई-सेवेला खीळ बसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून ई तिकिटासाठी लागणारा पेपर रोल आणि पुरेशा मशीन्स उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यातच नादुरूस्त मशीन्स दुरूस्त करण्यासाठी त्यांचा तंत्रज्ञही उपलब्ध होत नसल्याचे उपक्रमाचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या पेपर तिकिट प्रवाशांना द्यावे लागत आहे. सद्यस्थितीला दीडशे ते दोनशे मशीन्स उपक्रमाला आवश्यक आहेत. परंतु कंत्राटदाराकडून प्रारंभी शंभर मशीन्स उपलब्ध व्हायच्या. ही संख्या आजघडीला चाळीसच्या आसपास आल्याकडेही उपक्रमाने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
परिवहन समितीही नाराज : मध्यंतरी नवीन निविदा प्रक्रिया पार पडेपर्यंत या कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासंदर्भात परिवहन समितीच्या सभेत उपक्रमाकडून प्रस्ताव दाखल केला होता. परंतु समितीने कंत्राटदाराच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित प्रस्ताव स्थगित ठेवला होता. यामुळेही कंत्राटदार काम करण्यास नाखुश असल्याची चर्चा आहे.
नव्याने निविदा काढणार : सध्याच्या कंत्राटदाराचा संपुष्टात येत असलेला कालावधी आणि त्याच्याकडून सेवा देताना होत असलेली टाळाटाळ यात नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया केडीएमटी उपक्रमाने सुरू केली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे या विभागाचे प्रमुख तथा लेखाधिकारी सुधाकर आठवले यांनी दिली.