चायना बनावटीच्या सिम बॉक्सची एक लाख ४० हजारांमध्ये खरेदी, आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:17 PM2017-10-23T22:17:52+5:302017-10-23T22:21:19+5:30
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील दहा आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
ठाणे - भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील दहा आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
वसीम शेखसह त्याच्या साथीदारांनी नियाज शेख याच्यासह दहा जणांच्या टोळक्याकडून ३० ते ३५ हजार रुपये कमिशनचे अमिष दाखवून सिम बॉक्स मशिन भिवंडीतील या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजमध्ये बसविले होते. ही चायना बनावटीची गेटवे मशिन (सिम बॉक्स ) एक लाख ४० हजारांमध्ये आॅनलाइन खरेदी केल्याची माहिती या आरोपींच्या पोलीस चौकशीत उघड झाली. त्यामुळे ही सर्व २६ मशिन्स ३६ लाख ४० हजारांमध्ये खरेदी केल्याची माहिती उघड झाली. यातून ही टोळी महिन्याला लाखो रुपये कमाई करीत होती. नियाज शेख, मोहमंद मोमीन, नदीम शेख, महंमद उमर खान, महंमद अर्शद शेख, फुजैल शेख, समशाद अन्सारी, फकेआलम शेख, आलीम शेख आणि समशेर शेख या सर्व आरोपींची २३ आॅक्टोबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील नियाज शेख सह नऊ जणांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने ११ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. तर समशेर शेख याला १३ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. या दहा जणांकडे या गुन्ह्याच्या चौकशीची गरज असल्याने त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र आधीच १४ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यामुळे त्यात आणखी वाढ करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.