अपघाताची दृश्य दाखवून वाहतूक पोलिसांनी केले चालकांचे अनोखे समुपदेशन, पालकांसह पाल्यांच्याही डोळयात घातले अंजन
By जितेंद्र कालेकर | Published: January 16, 2023 09:58 PM2023-01-16T21:58:50+5:302023-01-16T22:00:13+5:30
Traffic Rule: स्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने चालकांचे समुपदेशन केले. नियम मोडणाºया तरुणांसह त्यांच्या पालकांनाही नियम पाळणे कसे जरुरी आहे, हे दाखवून देण्यासाठी अपघातांमधील भीषणताच दाखवून दिली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने चालकांचे समुपदेशन केले. नियम मोडणाºया तरुणांसह त्यांच्या पालकांनाही नियम पाळणे कसे जरुरी आहे, हे दाखवून देण्यासाठी अपघातांमधील भीषणताच दाखवून दिली. पोलिसांनी अशा प्रकारे कारवाईऐवजी डोळयात अंजन घातल्यामुळे यापुढे तरी नियम पाळण्याची ग्वाही ठाण्यातील १२७ तरुणांनी तसेच त्यांच्या पालकांनीही पोलिसांना दिली.
ठाणे शहर पोलिसांच्या घोडबंदर रोड येथील मंथन सभागृहात पुणे आणि मुंबईतील मोठया अपघाताची सीसीटीव्ही फूटेजद्वारे मिळालेली दृश्य दाखवून नियम पाळणे कसे आवश्यक आहे, हे या नवतरुण चालकांच्या मनावर बिंबवले. ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड, सहायक पोलिस आयुक्त कविता गावित, पोलिस निरीक्षक रवींद्र वाणी, चेतना चौधरी, सुरेश खेडेकर, संदीप सावंत आणि तुकाराम पवळे आदी अधिकाºयांनी यावेळी नियम न पाळणाºया चालकांचे समुपदेशन केले. यावेळी हेल्मेट घातल्यामुळे अपघातातून कसे बचावले जाते तसेच ते न घातल्यास कसा मृत्यू ओढवतो. तसेच सीट बेल्ट घालणे कसे आवश्यक आहे, हे सायरस मिस्त्री यांच्या अपघातातून दाखविण्यात आले.
गेल्या एक आठवडयापासून ठाणे शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. याच काळात वाहतूकीचे नियम न पाळणाºया चालकांना तसेच अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईऐवजी या समुपदेशन उपक्रमाला आपल्या पालकासंह पाचारण केले होते.
वाहतूक नियमनाचे तुम्हीही समुपदेशन करा- कराळे
या उपक्रमाला वाहतूक नियमांचे तरुणांना तसेच त्यांच्या पालकांना ठाण्याचे सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी उदाहरणांसह धडे दिले. आता असेच समुपदेशन तुम्ही इतरांचेही करा आणि अपघातातून लोकांचे प्राण वाचविण्याचे राष्टÑीय कार्य करा, असा सल्लाही त्यांनी दिला. अवध्या पाच सेकंदाच्या सिग्नलवरील घाईनेही मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे तो न तोडण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
उपायुक्त विनय राठोड यांनी या चालकांशी संवाद साधत नियम पाळल्यास वित्त आणि जिवित हानी कशी टाळता येऊ शकते, याचे महत्व अपघातांच्या व्हिडिओद्वारे विशद केले.
महाविद्यालयात जातांना हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी माजीवडा येथे पकडले होते. त्यामुळेच मामासह या समुपदेशनाला आलो होतो. अपघातांचे व्हिडिओ पाहून चांगलाच धडा मिळाला. त्यामुळे मी यापुढे हेल्मेट तर घालणार शिवाय वाहतूकीचे नियमही पाळणार आहे.
रोशन वानखेडे, दुचाकीस्वार, ठाणे.