वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम
By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2023 10:22 PM2023-10-04T22:22:18+5:302023-10-04T22:23:07+5:30
ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली.
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे तहसीलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी धडक कारवाई केली. मुंब्रा ते डोंबिवली या खाडीपात्रात गस्त घालताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ही अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि ठाणे तलाठी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली. ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली.
मुंब्रा खाडीच्या पात्रामध्ये १२ सप्टेंबर रोजी जिलेटीन आणि डेटिनोटरच्या कांड्या असलेली अनधिकृत बोट आढळली होती. बुधवारी पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडीपात्रात आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यामुळे खाडीपात्रात मेरिटाइम बोर्ड व सागरी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सकाळी पाच वाजल्यापासून खाडीपात्रात सर्च ॲापरेशन केल्यानंतर पाच ते सहा तासांनंतर एक अनधिकृत बोट आढळली आणि तिच्यावर यशस्वीरीत्या कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दक्षता पथक दाेनच्या टीमसह तलाठी सोमा खाकर, अरुण कासार, नीलेश कांबळे, राहुल भटकर, रत्नदीप कांबळे, सतीश चोधरी, धोंडिबा खानसोले, मंडळ अधिकारी राजेश नरोटे आदी उपस्थित होते.