टिटवाळ््याच्या गर्दीवर बायपास रस्त्याचा उतारा
By admin | Published: March 15, 2017 02:29 AM2017-03-15T02:29:53+5:302017-03-15T02:29:53+5:30
टिटवाळा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोवेली ते गुरुवली उड्डाणपूल बायपास रस्ता तयार करावा
कल्याण : टिटवाळा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोवेली ते गुरुवली उड्डाणपूल बायपास रस्ता तयार करावा, असा प्रस्ताव भाजपा आमदार किसन कथोरे यांनी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे मांडला आहे.
कथोरे यांनी मंगळवारी रवींद्रन यांची भेट घेतली. जवळपास दीड किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता तयार केल्यास मंदिर परिसरातील कोंडी दूर होईल. गोवेली ते मंदिर परिसर हा रस्ता असून, तो मंदिरालगत अरुंद रस्ता आहे. त्या रस्त्याद्वारे खडवली, राया या गावांकडे जाता येते. तसेच टिटवाळा रेल्वेस्थानकापासून मंदिराकडे रस्ता जातो. टिटवाळा मंदिर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मंदिर परिसरापासून खडवली, राया, रेल्वेस्थानक, गोवेली, मुरबाड, वासिंद येथे जाता येते. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर गुरवली येथे महापालिकतर्फे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पूल उभारल्यानंतर तेथील फाटक बंद होणार आहे. या सगळ््याचा विचार करून टिटवाळा बायपास रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव कथोरे यांनी मांडला. दीड किलोमीटरचा रस्त्याचा काही भाग कल्याण ग्रामीण व महापालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे काँक्रिटचा अर्धा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग तर उर्वरित रस्त्याचा खर्च हा महापालिकेच्या निधीतून करावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर या रस्त्याच्या मंजुरीबाबत रवींद्रन यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्यासाठीही महापालिकेने जागा देण्याची मागणी कथोरे यांनी केली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील फूल बाजाराच्या नव्या इमारतीच्या बांधकामास महापालिकेने अजूनही परवानगी दिलेली नाही. ती त्वरित द्यावी, अशी मागणीही त्यांनी रवींद्रन यांच्याकडे केली. त्यावर जातीने लक्ष घालण्याची ग्वाही रवींद्रन यांनी कथोरे यांना दिली आहे.
केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात आली. त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ही गावे कल्याण पूर्वेला पिसवली ते शीळ फाटा या मार्गालगत आहेत. सात गावे अंबरनाथ तहसील कार्यालयांतर्गत येतात. त्यामुळे त्यांचा संपर्क आता कल्याण पंचायत समितीशी नाही. कल्याण पूर्वेपासून टिटवाळा, खडवली, अंबरनाथच्या दिशेने कल्याण तालुक्यातील १०० गावे ही कल्याण तहसील कार्यालयाच्या हद्दीत येतात. त्यापैकी जांभूळ व वसत ही गावे अंबरनाथ तहसील कार्यालयात समाविष्ट करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ही भौगोलिक पार्श्वभूमी पाहता कल्याण पंचायत समितीचे फुले चौकासमोरील कार्यालय हलवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
पंचायत समितीचे कार्यालय गोवेली येथे उभारण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यासाठी ग्राम विकास खात्याकडून सात कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात येणार आहे. सध्याचे पंचायत समिती कार्यालय हे धोकादायक इमारतीत आहे. गोवेली हे टिटवाळा रेल्वे स्थानकापासून जवळ आहे. तसेच ते कल्याण-मुरबाड राज्य मार्गावर आहे. वाहतुकीच्या दृष्टीने गोवेली सोयीची आहे. टिटवाळा बायपास रस्ता झाल्यावर गोवेली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पंचायत समितीचे कार्यालय गाठण्यासाठी कल्याण तालुक्यातील ग्रामस्थांना कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत धाव घेण्याची गरज भासणार नाही. कल्याण जिल्हा करण्याच्या मागणीवर कथोरे ठाम आहेत. कल्याण जिल्हा झाल्यास गोवेली तालुका होणार आहे. (प्रतिनिधी)