सीए आत्महत्या प्रकरणाला कलाटणी: ब्लॅकमेल करीत दिड कोटींची रक्कम लुबाडल्यामुळेच वडिलांची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Published: March 29, 2021 09:01 PM2021-03-29T21:01:48+5:302021-03-29T21:04:35+5:30
बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनी हल्ला करुन शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. मात्र, या बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
कल्याणच्या खडकपाडा, वायलेनगर येथे राहणाºया साहिल शोबराज याने २८ मार्च २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, ठाण्यातील सावरकरनगर येथील पाटीलवाडी भागात राहणारी मुमताज उर्फ नलिनी शर्मा तसेच तिच्या अन्य दोन बहिणी पिया आणि कमल (तिघींच्याही नावात बदल केला आहे) यांनी २०१६ ते २३ मार्च २०२१ या कालावधीमध्ये शोभराज यांना वारंवार ब्लॅकमेल करुन त्यांना मानसिक त्रास दिला. या काळात त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींची रक्कम लुबाडली आहे. या तिघींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शोभराज यांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना ही आत्महत्या करण्यास या तिघीेंनी प्रवृत्त केले.
* काय घडला होता प्रकार-
वारंवार पैशांची मागणी करणाºया बारबालेवर चाकूने खुनीहल्ला करून शोभराज यांनी स्वत:ही बाळकूम येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी शोभराज यांच्याविरु द्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २४ मार्च रोजी दाखल झाला होता.
शोभराज यांचे या ३३ वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती. यातूनच झालेल्या वादातून त्याने ठाण्यातील बाळकूमनाका येथील रेसिडेन्सी हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत: खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती.
दरम्यान, खूनाचा प्रयत्न आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपीचा मृत्यु झाल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी सादर केली जाणार आहे. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात बारबालेसह तिघींची चौकशी केली जाणार असून गरज पडल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.