ईडीच्या चौकशीच्या भीतीनेच ठाण्यातील सीएने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 06:05 AM2020-10-19T06:05:01+5:302020-10-19T06:05:26+5:30
भाडेकरूसोबत झाला होता करार, वारस नोंदणीसाठीही केली होती चौकशी
जितेंद्र कालेकर
ठाणे : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा तसेच अटकेच्या भीतीनेच मुंबईतील तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा असलेल्या ‘कॉक्स अॅण्ड किंग्ज लिमिटेड ट्रनर मॉडीसन’ या आंतरराष्ट्रीय टूर्स कंपनीचा लेखापाल (सीए) सागर सुहास देशपांडे (३८, रा. चरई, ठाणे) याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे टिटवाळा येथील घरासाठी वारस नोंदणी करण्यासाठीही त्याने दोन आठवड्यांपूर्वीच चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हजारो कोटींच्या गैरव्यवहारामुळे या कंपनीच्या काही संचालकांना अटक झाली आहे. यासंबंधी कंपनीवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यातच कंपनीचा सीए सागरचीही याच प्रकरणातील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. पुन्हा १३ ऑक्टोबर रोजीही त्याला पाचारण केले होते. तत्पूर्वीच ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा येथे जाऊन येतो, असे वडील सुहास देशपांडे यांना सांगून तो ठाण्यातील घरातून बाहेर पडला होता. मात्र, १२ ऑक्टोबर रोजी त्याने कल्याण परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. तब्बल पाच दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांकडून समजली.
दरम्यान, ईडीकडून अटक होऊ शकते, या भीतीने सागरला ग्रासले होते. तसे त्याने काही मित्रांकडे बोलून दाखविले होते. यातूनच त्याने आत्महत्येचा विचार पक्का केला. पण, त्याआधी टिटवाळ्यातील घराच्या भाडेकराराचे नूतनीकरण करणे आणि त्या घरासाठी वारस नोंद करण्यासाठीही त्याने विचारपूस केली. टिटवाळा येथील भाडेकरूचा करार संपण्याला दीड महिन्याचा अवधी बाकी होता. मात्र, ऑडिट सुरू होईल, त्यासाठी लवकर अॅग्रिमेंट बनवायचे असल्याचे सांगून त्याने भाडेकरूकडून भाडेकरार ९ ऑक्टोबरला पूर्ण केला. त्या वेळीच त्याने घराला वारस नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा त्याच्या भाडेकरूकडे केली होती. घटस्फोटित असलेला सागर वारस म्हणून कोणाची नोंद करणार होता, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
दोन आठवड्यांपूर्वीच केला आत्महत्येचा निश्चय -
घराला वारस नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा सागरने त्याच्या भाडेकरूकडे केली होती. सोसायटीच्या सेक्रेटरीकडे अन्यथा बिल्डरकडून तशी नोंदणी करावी लागेल, असा सल्लाही या भाडेकरूने दिला होता. यावरून दोन आठवड्यांपूर्वीच सागरने आत्महत्येचा निश्चय केला होता, हे स्पष्ट होत असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.