काँग्रेस, राष्ट्रवादी गटनेत्यांची केबिन सील
By admin | Published: July 6, 2017 06:05 AM2017-07-06T06:05:56+5:302017-07-06T06:05:56+5:30
बेकायदा घेतलेला केबिनचा ताबा व एकूण संख्याबळाच्या १० टक्या पेक्षा कमी संख्येने निवडून आलेले नगरसेवक, असे कारण देत तब्बल
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : बेकायदा घेतलेला केबिनचा ताबा व एकूण संख्याबळाच्या १० टक्या पेक्षा कमी संख्येने निवडून आलेले नगरसेवक, असे कारण देत तब्बल पाच पक्षाच्या केबिनना पालिका आयुक्तांनी सील ठोकले आहे. याविरोधात आवाज उठवण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी व रिपाइने दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेत विरोधी बाकावर बसलेले काँॅग्रेस, भारिप, पीआरपी पक्षाचे प्रत्येकी एक, रिपाइ पक्षाचे २, राष्ट्रवादीचे ४ तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिका सत्तेतील भाजपा-ओमी टीमचे ३२ व साई पक्षाचे १३ नगरसेवक निवडून आले. कायद्यानुसार पालिकेत निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या १० टक्के नगरसेवक निवडून आल्यावर गटनेत्यासाठी कार्यालय मिळते. या नियमावर पालिका आयुक्तांनी बोट ठेवत दिलेली कार्यालये हिसकावून घेतल्याचा आरोप भारिपचे जिल्हाध्यक्ष सुधीर बागूल यांनी केला आहे.
महापालिकेची प्रथा पाहता सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना यापूर्वी कार्यालय दिली आहेत. त्यानुसारच कार्यालय घेतले असून पालिकेने सर्व सुविधा दिल्या आहेत. तसेच कार्यालयासमोर गटनेत्याचे नामफलक लावले आहेत. मग दोन महिन्यानंतर कसा निर्णय घेतला, असा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी उपस्थित केला आहे. मात्र पालिकेतील ही प्रथा मोडीत काढण्याचे संकेत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे. महापौरांसह स्थायी समिती, प्रभाग व विशेष समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या विरोधात पाचही पक्ष उभे ठाकल्याने कार्यालय सील केल्याचा आरोप या पाचही पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.