ठाण्यातून वीज वितरण कंपनीची केबल चोरणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 10:43 PM2021-11-14T22:43:36+5:302021-11-14T22:45:48+5:30
राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची केबल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूरबावडी येथील हायस्ट्रीट मॉलच्या पाठीमागे असलेल्या एका नाल्यातून राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवरील आवरण काढून त्यातील तीन लाख रुपययांचे तांबे आणि गॅव्हनाइज स्टील काढून ते चोरी झाल्याची तक्रार १३ नोव्हेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीने दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस उत्तम सोनवणे, निरीक्षक प्रियत्तमा मुठे आणि संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राजू याच्यासह करण मुकणे (१९, रा. कापूरबावडी, ठाणे), सोमनाथ लिंबाडे (५२, रा. धर्मवीरनगर, ठाणे), माणिक पंचवडे (२७, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि पवन पवार (२४, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या चौघांना रविवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, कटर आणि एक लाख रुपयांचे केबलचे गॅल्व्हनाइज स्टील, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील सर्व आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारे कुठे चोऱ्या केल्या आहेत का, चोरीतील उर्वरित केबलची कुठे विल्हेवाट लावली, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.