भिवंडीतील मुंबई मनपाच्या पाणीपुरवठा चौकीत शिरला ‘काेब्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:02+5:302021-06-28T04:27:02+5:30
भिवंडी : पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे आणि हवामानबदलामुळे भक्ष्याच्या शाेधात साप मानवी वस्तींत आसरा घेत आहेत. रविवारी कोब्रा जातीचा ...
भिवंडी : पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे आणि हवामानबदलामुळे भक्ष्याच्या शाेधात साप मानवी वस्तींत आसरा घेत आहेत. रविवारी कोब्रा जातीचा नाग हा पाेगाव येथील मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चौकीत शिरल्याने तेथील कामगारांची पळापळ झाली. पत्र्याच्या आडाेशाला बसलेल्या या नागाला सर्पमित्र हितेश करंजावकर यांनी पकडल्यानंतर सर्व कामगारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पोगावमधून मुंबई महापालिकेची जलवाहिनी जात असून तिची देखरेख करण्यासाठी येथे चाैकी उभारलेली आहे. या चाैकीत दुपारी फिटर गणेश चौधरी यांना लांबलचक नाग दिसला. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता ताे चौकीच्या मागे असलेल्या एका पत्र्याखाली जाऊन बसला. त्यानंतर त्यांनी चौकीत नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र करंजावकर यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत या नागाला पकडून पिशवीत बंद केले. साडेपाच फूट लांबीच्या या नागाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर जंगलात सुरक्षितपणे साेडण्यात आल्याचे करंजावकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी साप दिसल्यास सर्पमित्रांना त्याची तत्काळ माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले.