कॅडबरी रस्त्याच्या रुंदीकरणाची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:16+5:302021-09-21T04:46:16+5:30
ठाणे : शहरातील सर्वात जास्त रुंद असलेल्या कॅडबरी ते येऊरच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. ...
ठाणे : शहरातील सर्वात जास्त रुंद असलेल्या कॅडबरी ते येऊरच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. विकास आराखड्यात ४० मीटर रुंद असलेल्या या रस्त्याचे ४८ मीटर रुंदीकरण करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गरिबांच्या दुकानांवर कारवाई केली. त्यामुळे आता किती मीटर रस्त्याला प्रशासकीय मान्यता घेतली होती, याची चौकशी करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल याच्या कार्यकाळात कॅडबरी ते येऊर पोखरण रोड क्रमांक एकचे रुंदीकरण करण्यात आले होते. भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण शहर विकास आराखड्यातील नोंदीप्रमाणे झाले आहे का? तसेच शहरविकास आराखड्यातील रस्त्याची लांबी-रुंदी बदलण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उतर देताना शहर नियोजन अधिकारी शैलेंद्र बेंडाळे यांनी सांगितले की, तो रस्ता शहरविकास आराखड्यातील नोंदीप्रमाणे ४० मीटर आहे. परंतु, प्रत्यक्षात रस्त्याची मार्किंग रेषा ४८ मीटर असल्याने त्याचे रुंदीकरण ४८ मीटर इतके केले आहे. शहरविकास आराखड्यात काही बदल करायचा असेल तर महासभेची मंजुरी घ्यावी लागते, असेही त्यांनी सांगितले.
त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठीच हा रस्ता जास्त रुंद केल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला. आठ मीटर रस्ता रुंद करून त्याच्या मजबुतीकरणासाठी महापालिकेचा निधी खर्च केला होता. त्यामुळेच महापालिकेला आर्थिक चणचण भासत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेची परवानगी न घेता ४० मीटर ऐवजी ४८ मीटर रस्स्त्याचे काँक्रिटिकरण केले असेल, त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेतली नसेल तर त्यावेळच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होऊ शकते. त्यामुळे चौकशीचा ठराव मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केली. त्यास अर्चना मणेरा यांनी अनुमोदन दिल्याने महापौर नरेश म्हस्के यांनी त्यास मान्यता दिली.