काेराेनामुळे उन्हाळी शिबिरे ऑनलाइन व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:53+5:302021-05-16T04:38:53+5:30
ठाणे : उन्हाळी सुटी सुरू झाली की विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांची रेलचेल चालू होते. यंदा या शिबिरांना कोरोनाचा ...
ठाणे : उन्हाळी सुटी सुरू झाली की विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांची रेलचेल चालू होते. यंदा या शिबिरांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गेल्या वर्षी बहुतांश नियोजित उन्हाळी शिबिरे रद्द करावी लागली होती. यंदा दुसऱ्या लाटेनंतर काहींनी शिबिरे रद्द केली, तर काहींनी ही शिबिरे ऑनलाइन व्यासपीठावर आणली आहेत.
चित्रकला रेखाटन, नृत्य प्रशिक्षण, क्रिकेट, गायनकला, नाट्यकला शिबिरे, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, साहसी शिबिरे, सैनिक प्रशिक्षण शिबिरे, गिर्यारोहण, जंगल भ्रमंती, हायकिंग, ट्रेकिंग, स्वीमिंग अशी शिबिरे आयोजित केली जातात. उन्हाळी सुटी दीड ते दोन महिन्यांची असते. अशावेळी मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा किंवा नव्याने काही शिकता यावे या हेतूने ही शिबिरे भरवली जातात. मुलांच्या किंवा पालकांच्या आवडीनुसार शिबिरे निवडली जातात. दोन वर्षे कोरोनाने उन्हाळी शिबिरे अडचणीत सापडली आहेत. काहींनी यंदाच्या उन्हाळी सुटीत ऑनलाइन शिबिरे घेण्याचे ठरविले, तर काहींनी दोन्ही वर्षे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------------------------
गेल्यावर्षी सरस्वती मंदिर ट्रस्ट आयोजित शिबिर कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते असे संस्थेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. यंदा १७ ते ३० मे या कालावधीत उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात योगसाधना, सूर्यनमस्कार, व्यायाम, खेळ, भाषा संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास, नाट्य या विषयांवर शिबिर घेतले जाणार आहे.
-----------------------------------
क्रीडा संवादतर्फे ॲथलेटिक्स या विषयावर उन्हाळी शिबिर घेतले जाते. दोन्ही वर्षे ती रद्द केली आहेत.
- एकनाथ पोवळे, क्रीडा संवाद
----------------------------------
दरवर्षी ठाणे जिमखाना व श्री माँ गुरुकुल यांच्या वतीने क्रिकेटचे वर्ग घेतले जातात. क्रिकेट हे ऑनलाइन शिकवू शकत नसल्याने सध्या ऑनलाइन फिटनेस शिकवले जाते.
- दर्शन भोईर, क्रिकेट प्रशिक्षक
----------------------------------
गेल्या वर्षी आम्ही ऑनलाइन शिबिरे विद्यार्थ्यांसाठी घेतली होती. यंदाही ऑनलाइन शिबिरे घेणार आहोत. सध्या सर्वच ऑनलाइन असल्याने मुलांना नवीन शिकवता येईल.
- संध्या सावंत, मातृसेवा फाउंडेशन
----------------------------------
आमची १० ते १४ वयोगटांतील मुलांसाठी सर्वांगीण विकास विषयावर निवासी उन्हाळी शिबिर घेतले जाते. दोन्ही वर्षे कोरोनामुळे हे शिबिर रद्द केले आहे.
- सरिता कामटेकर, बाल उत्कर्ष