कारवाईचा अहवाल मागवला; हप्तेखोर सहायक आयुक्तांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:21 AM2019-06-21T00:21:54+5:302019-06-21T00:22:09+5:30
फेरीवाल्यांवर कारवाईचा मुद्दा ठामपा महासभेत गाजला
ठाणे : गेल्या १० दिवसांत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ज्याज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्याची कारणे व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी तपशीलवार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. नालेसफाई आणि प्रभाग समितीनिहाय फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ मागवण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना केल्या. त्यामुळे सदस्यांनी बुधवारी हप्तेखोरीचा आरोप केलेल्या सहायक आयुक्तांची पाचावर धारण बसली आहे.
गुरुवारी सकाळी सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये किती ठिकाणी पाणी साचले होते, ते साचण्याची कारणे काय होती आणि त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या, याचा संध्याकाळपर्यंत अहवाल मागवला असून तो प्राप्त झाल्यानंतर ज्याज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या सर्व ठिकाणी संबंधित अधिकाºयांसोबत तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे.
नालेसफाईच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी झालेल्या कामाचा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश घनकचरा विभागास दिले, तर प्रभाग समिती स्तरावर फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवालही सायंकाळपर्यंत मागवण्याचे आदेश अतिक्र मण विभागास दिले. दरम्यान, पावसाळा सुरू असला तरी पाणीकर, मालमत्ताकर वसुलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगून त्यांनी सर्व विभागप्रमुखांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
सहायक आयुक्त बिथरले
नालेसफाई आणि प्रभाग समितीनिहाय फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ मागवल्याने हप्तेखोरीचा आरोप झालेले सर्व नऊ सहायक आयुक्त कमालीचे बिथरले आहेत. या अहवालानंतर आयुक्त त्यांना पाठीशी घालतात की, निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करतात, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. ठाणे स्थानक परिसर, नौपाडा परिसर, वागळे इस्टेट, कोपरी, माजिवडा परिसरांत सर्वाधिक फेरीवाले असल्याने तेथील अधिकारी कमालीचे धास्तावले आहेत.
अंबिकानगरात कारवाई
महापालिकेच्या महासभेत बुधवारी फेरीवाल्यांवरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गुरुवारी वागळे प्रभाग समिती कार्यालयाने अंबिकानगर येथील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करून जवळपास ७० हातगाड्या, सहा बाकडी, पाच लोखंडी टेबल गुरुवारी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. ही कारवाई वागळे प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी केली असून यापुढेही अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.