कोरोनासंदर्भातील तक्रारींसाठी कॉल सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:47 PM2020-06-11T23:47:49+5:302020-06-11T23:48:02+5:30
अंबरनाथ पालिका : समस्या संबंधित विभागांपर्यंत तत्परतेने पोहोचवणार
अंबरनाथ : कोरोनाबाधित व संशयित कोरोनाग्रस्तांना योग्य मदत मिळत नसल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोनासदृष्य लक्षणे असलेल्या आणि कोरोनाग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने कॉल सेंटर सुरु केले आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हे सेंटर सुरू राहणार असून नागरिकांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
अंबरनाथमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या तक्रारीही वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण, कोरोनाचे लक्षण असलेले रुग्ण आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना काही तक्रार, समस्या भेडसावल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पालिकेने कार्यालयातच संपर्क केंद्र उभारले असून त्या केंद्राच्या माध्यमातून येणाºया तक्रारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत.
अंबरनाथमध्ये अनेक कोरोनासदृष्य लक्षणे असलेले रुग्ण उपचाराअभावी शहरात भटकताना दिसत आहेत. त्यातच काही रुग्णांना रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेतल्यावर बुधवारी पालिकेने स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. तर गुरुवारी तक्रारी प्राप्त करून घेण्यासाठी कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच सुरू होणार कोरोना रुग्णालय
अंबरनाथ पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी आदेश देऊन प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांना त्यांच्या कामाची रूपरेषा, कामाचा कालावधी निश्चित करून दिला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला संपर्क करणे सोपे होणार आहे. त्यातच शुक्रवारी किंवा शनिवारी डेंटल कॉलेजमधील कोरोना रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याने या रुग्णालयात समस्या त्वरित सोडवणे शक्य होणार असल्याचे गिरासे यांनी स्पष्ट केले.