रुग्णालयांच्या लुटमारीविरूद्ध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:53 AM2019-06-12T00:53:33+5:302019-06-12T00:53:54+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये नागरिकांचे स्वाक्षरी अभियान : माणुसकी दाखवण्याचे आवाहन
मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींकडून एकीकडे महापालिका रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकिय सुविधाच पुरवल्या जात नाहीत. दुसरीकडे शहरातील काही खाजगी रुग्णालयांकडून रुग्ण आणि नातलगांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन मनमानी लूट केली जात असल्याचा आरोप करत नागरीकांनी त्याविरोधात निदर्शने करून, सह्यांची मोहिम चालवली आहे.
भार्इंदर पुर्वेला रेल्वे स्थानक व परिसरात नागरिकांच्या वतीने काही खाजगी रुग्णालयांनी चालवलेल्या लुटमारीविरोधात निदर्शने करण्यात आली. देशाचा कायदा रुग्णालयांकडून होणारी लूट व बेईमानांच्या आतंकापासून नागरिकांची सुटका कधी करणार, असा सवाल करणारे फलक नागरिकांनी हाती घेतले होते. त्याचबरोबर माणुसकी दाखवा असे आवाहनदेखील खाजगी रुग्णालयांना यावेळी करण्यात आले. यावेळी पत्रकं वाटून त्यावर नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या.
पत्रकामध्ये काही खाजगी रुग्णालयांकडून बेईमानी कशी केली जाते, हे नमुद केले आहे. त्यात कारण नसताना वयोवृध्दांना आयसीयूमध्ये ठेवले जाते. गरज नसताना गरोदर महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती केली जाते. अनावश्यक तपासण्या करायला लावल्या जातात. गरज नसताना रुग्णास रुग्णालयात ठेवले जाते. भरमसाठ औषधं दिली जातात आणि तीही रुग्णालयातील औषधाच्या दुकानातूनच घ्यावी लागतात.
उपचार आणि देखभालीत हलगर्जीपणा केला जातो. परंतु देयक मात्र वाट्टेल तसे आकारले जाते. रुग्णालयांना शासन, न्यायालय आदी कोणाचाही धाक राहिलेला नसून, त्यांच्यासाठी कायदासुध्दा कठोर नाही. रुग्ण वा नातलगांची तक्रार घेऊन अशा रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माझ्या पत्नीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला. तिला एकापाठोपाठ एक तीन रूग्णालयांमध्ये दाखल केले होते. तीनही रुग्णालयांचे १७ लाख रूपये बील झाले. लोकांकडून उसने घेऊन, कर्ज काढून रुग्णालयास पैसे भरले. या रुग्णालयांविरोधात मेडिकल काऊन्सिलकडे तक्रारी केल्या. आता ठाणे न्यायालयात फौजदारी गुन्ह्यासाठी दावा दाखल केला आहे. माझ्यासारख्या अनेकांना उध्वस्त करण्याचे काम काही खाजगी रुग्णालयांकडून सुरु आहे. आतंकवाद्यांपेक्षा जास्त हे डॉक्टर व त्यांची रुग्णालयं घातक आहेत. त्यातूनच नागरीकांनी ही मोहिम सुरु केली आहे. - लालजी भानुशाली, ज्येष्ठ नागरिक
भानुशालीसारख्या अनेकांना काही खाजगी रुग्णालयांकडून शोषण करण्याचा रोज अनुभव येत असतो. कमी वेळात काही डॉक्टर व त्यांची रुग्णालये झपाट्याने वाढली आणि आलिशान झाली आहेत. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठुन? याविरोधात आंदोलन आणखी तिव्र करु.
- प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्ता