आव्हाड धर्मनिरपेक्ष असल्यामुळेच प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:16 AM2019-10-19T00:16:20+5:302019-10-19T00:17:52+5:30
कन्हैय्या कुमारांचा दावा : साधला विद्यार्थ्यांशी संवाद
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे. कारण, ते जातीयवाद व फॅसिझमविरोधातील आपल्या लढ्यावर तसेच पुरोगामी विचारधारेवर ठाम आहेत. मला विश्वास आहे की, ते आपल्या विचारधारेशी प्रतारणा करून भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, म्हणूनच मी त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे, असे उद्गार फॅसिझमविरोधी विचारधारेतील विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी काढले.
मुंब्रा-कौसा येथील ए.ई. काळसेकर डिग्री कॉलेज, एम.एस. कॉलेज आॅफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड बीएमएस, सिम्बायोसिस कॉलेज येथे कन्हैय्या कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शानू पठाण, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. आव्हाड सेक्युलर विचारधारेवर ठाम आहेत. पक्ष जरी कधी कम्युनल झाला, तरी ते पक्षाविरोधात जाण्याची त्यांची हिम्मत आहे. ते कधीच ईडी, सीबीआयच्या नोटीसला घाबरत नाहीत. मृत्यूला घाबरत नाहीत. त्यांना आरएसएस, मोदींना हरवायचे आहे. जातीयवादी-धर्मांध विचारधारेचा पराभव करण्याची इच्छाशक्ती आव्हाड यांच्यात आहे. त्यांच्या या वैचारिक हिमतीला दाद देण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
आझादीचा तराणा सादर
यावेळी कन्हैय्या कुमार यांनी आझादीचा तराणा गायला. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कन्हैय्या कुमार व जितेंद्र आव्हाड यांचे जोरदार स्वागत विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी स्पर्धा लागली होती.