निवडणुकीचा प्रचार शिगेला, सोशल मीडियावर कोकण पदवीधरची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:15 AM2018-06-23T03:15:52+5:302018-06-23T03:16:00+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून इतिहासात प्रथमच ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून इतिहासात प्रथमच ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी ती केव्हा व्हायची याचा थांगपत्ताच लागत नव्हता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत कांटे की टक्कर आहे. ही निवडणूक आगामी निवडणुकांवर परिणाम करणारी ठरण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
रिंगणातील एकूण १४ उमेदवारांपैकी भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला या प्रमुख तीन उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
येत्या सोमवार, दि. २५ जून रोजी या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. एकूण १ लाख ४ हजार २६४ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी नेमके किती मतदानाला बाहेर पडतात याचेही औत्सुक्य आहे. मतदान जसे जवळ येऊ लागले आहेत. तसे प्रमुख उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनी मतदारांना एसएमएस, फोन, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून स्वत:ला निवडून देण्याचे आवाहन करण्यास सुरु वात केली आहे. उमेदवारांनी आपल्या कार्याचे अहवाल यापूर्वीच मतदारांपर्यत पोस्ट अथवा कुरियर सेवेच्या माध्यमातून पोचते केले आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांनी त्यांची मोठमोठी होर्डिंग्ज लावून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यात मतदारांचा आकडा सर्वाधिक म्हणजेच ४५ हजार ८३४ असल्याने या जिल्ह्यात उमेदवारांनी प्रचारावर अधिक जोर दिला आहे. प्रत्येक उमेदवाराने मतदारांना आवाहन करण्यासाठी कॉल सेंटर उभे केले असून तेथून मतदारांशी मोबाइल फोनवर संपर्कसाधला जात आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्याबरोबरच कार्यअहवाल मिळाला नसेल तर त्याची लिंक शेअर केली जात आहे.
शिवसेनेनी आव्हान दिल्यावरही पालघरची निवडणूक प्रतिष्ठेची करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती जिंकून दाखवली. आता कोकण पदवीधरच्या निवडणुकीत विजय प्राप्त करून भाजपाचा पूर्वीचा हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखल्याचे बोलले जाते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांची टीम मिशन कोकण पदवीधरसाठी काम करीत आहे. त्यामुळे उमेदवार जरी डावखरे असले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांचा या निवडणुकीत कस लागला आहे. आयात उमेदवारामुळे भाजपात असलेली नाराजी व संघ परिवारातील मतदारांमध्ये अनुत्साह निर्माण होण्याची भीती, याचा फटका डावखरे यांनी बसू शकतो.
नजीब मुल्ला हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कोकण पदवीधरमधून उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादीतील अन्य काही वरिष्ठ पदाधिकारी इच्छुक होते. मात्र, आव्हाड यांनी आपले वजन वापरून मुल्ला यांना उमेदवारी मिळवून दिली. मुल्ला यांच्यावर अनेक गुन्हे असून काही खटले सुरु आहेत. सुशिक्षित पदवीधर याकडे कसे पाहतात, यावर त्यांचे यशापयश ठरणार आहे. मात्र, कोकण स्तरावर आव्हाड यांच्या नेतृत्त्वाला मर्यादा असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. ठाणे जिल्हयातील राष्ट्रवादीत अनेक गटतट आहेत. वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादीतील व अन्य पक्षातील अनेक नेत्यांना मित्रत्वाच्या नात्याने सहकार्य केले आहे.
>निवडणुकीच्या तोंडावर सेनेतील वाद चव्हाट्यावर
हितेंद्र ठाकूर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा कल कुणाकडे राहणार, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. अनेक नेत्यांनी डावखरे यांच्या पुत्राला विधान परिषदेत पाठवणे हीच वसंतरावांना श्रद्धांजली ठरेल, अशी भाषणे शोकसभेत केली होती. आता ते काय भूमिका घेतात, यावर बरेच काही ठरणार आहे. दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर सेनेमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. माजी आमदार अनंत तरे यांनी क्लस्टरच्या विषयावरून पालकमंत्री शिंदे यांच्यावर जाहीर टीका केली होती. निवडणूक प्रचारासाठी सेनेच्या जिल्हा कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीतच शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखात बाचाबाची झाली होती.
संजय मोरे हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक समजले जातात. पालघर निवडणुकीत सेनेने भाजपाच्या तोंडाला फेस आणला तरीही त्यांच्या पदरी पराभव आला. हा वचपा या निवडणुकीत काढण्यासाठी सेनेने कंबर कसली असली तरी सेनेमध्ये देखील सर्वकाही आलबेल आहे असे नाही.