वॉररूमद्वारे प्रचार पोहोचला शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:16 AM2019-10-16T01:16:39+5:302019-10-16T01:16:59+5:30

प्रचाराचे काम दिवसरात्र सुरू : मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

campaigning reached through the warroom | वॉररूमद्वारे प्रचार पोहोचला शिगेला

वॉररूमद्वारे प्रचार पोहोचला शिगेला

Next

ठाणे : निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या वॉररूम जोमाने कामाला लागल्या आहेत. मतदारांची यादी तयार करण्यापासून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या हक्काच्या उमेदवाराला मत देण्यासाठी जागरूक करण्याचे काम दिवसरात्र या वॉररूमच्या माध्यमातून सुरू झाले आहे. ठाणे शहरातील चार मतदारसंघांसह जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत थोड्याफार फरकाने सर्वपक्षीय उमेदवारांच्या वॉररूम याच धर्तीवर कार्यरत आहेत.


ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांत ४१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यानुसार, चार मतदारसंघांसह जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत उमेदवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू आहे. प्रचारफेऱ्या, रॅली, डोअर टू डोअर प्रचार, बाइक रॅली असा धडाका सध्या सुरू आहे. मात्र, तरीही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुसंख्य उमेदवारांनी आपली वॉररूमही सज्ज ठेवली आहे. या वॉरमधून एखाद्या विरोधकाने सोशल मीडियावरून आरोप केले असतील, त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे काम सुरूआहे. उमेदवाराच्या प्रगतीपुस्तकापासून ते भविष्यात काय करणार, याचा ऊहापोहसुद्धा इथे केला जात आहे.


असा होत आहे प्रचार
व्होटर स्लिप निवडणूक विभागाकडून पोहोचविण्यापूर्वीच उमेदवारांकडून मतदारांना पोहोचवल्या जात आहेत. मतदारांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मिळवून त्यावर मतदानासाठी आवाहन केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एखादा मतदार नसेल तर त्याला टेक्स मेसेज पाठविले जात आहेत. आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. तसेच आपल्या उमेदवारासाठी तयार केलेले गाणे, त्याची मुलाखत, रॅली, चौकसभा यांचेही अपडेट या वॉररूमच्या माध्यमातून चुटकीसरशी उपलब्ध करून दिले जात आहेत. बहुतेक उमेदवारांच्या वॉररूममध्ये दिवसरात्र काम करणारी १० ते १५ तरुणांची फळी सज्ज आहे. त्यांच्या मदतीला इंटरनेट आणि सात ते आठ संगणक, लॅपटॉप असे सर्व साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Web Title: campaigning reached through the warroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.