टिटवाळयातील खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:35 PM2019-08-12T16:35:07+5:302019-08-12T16:36:11+5:30
नागरिकांतून प्रशासनाविरुध्द निघतो नाराजीचा सूर, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.
उमेश जाधव
टिटवाळा : खड्डेमय रस्ते हे अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरून अनेकजणांच्या मृत्युचेही कारण ठरले आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार टिटवाळा शहरात घडताना दिसत आहेत. गेली पंधरा दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा पूर्वेकडील रस्त्यांची सध्या स्थितीला झालेली दयनिय अवस्था झाली आहे. यामुळे हे खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र टिटवाळा शहरासह बल्याणी- शहाड या रस्त्यावर पहावयास मिळते.
टिटवाळा पूर्वेकडील रहदारीचे मुख्य रस्ते सध्या दयनीय अवस्थेत असून ठिक ठिकाणी रखडलेले व खडेमय रस्ते येथून रहदारी करताना वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. निमकर नाका ते सावरकर नगर या रस्त्यावर निमकर नाका ते नाईक ऑटो पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र येथे दिसून येते. अशीच अवस्था मातादी मंदीर ते कल्याण-आंबिवली-शहाड या रस्त्याची झाली आहे. तसेच हरी ओम व्हॅली ते गणेश नगर डिजी वन समोरील रस्ता, नांदप रोड इंदीरा नगर, स्मशान भूमी रोड, मांडा सांगोडा रोड या रस्त्यांचा अक्षरशः चाळण झाली आहे. वाहना चालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांत दुचाकी आदळून अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. तसेच या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी नागरिक पायी प्रवास करत असतात वाहने खड्ड्यात आदळली की त्यातील पाणी त्यांच्या अंगावर उडण्याच्या घटना देखील घडत आहेत.
२०१४ सालापासून सुरु असलेल्या निमकर नाका ते सावरकर नगर ह्या रस्त्याचे घोडे अजून किती दिवस अडून राहणार आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा याबाबत पत्रव्यवहार करूनही निष्क्रिय प्रशासकीय व्यवस्थेमुळे परिस्थिती तशीच आहे. यामुळे येथील वाहनचालक आणि नागरिकाना या रस्त्यांवरून रहदारी करताना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच हे प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सूर नागरिकांतून निघत आहे.
२०१४ साली सदर रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. निमकर नाका ते सावरकर चौक ते नांदू रोड या रसत्यासाठी 5 कोटीच्या जास्त निधी मंजूर झाला आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत केव्हाच संपली असून देखील दोन्ही रस्तांची कामे सध्या अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे. चार वर्षं इतका प्रदीर्घ काळावधी संपून देखील रस्ते पूर्ण होत नाहीत. या अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जाणून बुडून पालिका प्रशासनाकडून टिटवाळा करांना त्रास देण्याचा प्रताप सुरू असल्याचा सुर येथून निघत आहे. पालिका प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.