आव्हाड यांना कोणी दम देऊ शकेल, यावर तुमचा विश्वास बसेल?, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष परांजपे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:46 AM2023-11-09T06:46:15+5:302023-11-09T06:46:37+5:30
संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता.
ठाणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या योगदानाचा व वयाचा विचार करता, त्यांच्याप्रती आदराने बोला, एकेरीत उल्लेख टाळा, असा सल्ला तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. सल्ला म्हणजे ती धमकी होत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता. आदिती या स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहेत, कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, असेही परांजपे म्हणाले.
आदिती स्वकर्तृत्वावर आल्या पुढे
२०१७ च्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर युती झाली होती. विजयानंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष व अडीच वर्षे शेकापचा अध्यक्ष अशी बोलणी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यात झाली होती. यानुसार आदिती तटकरे या अडीच वर्षे अध्यक्ष झाल्या होत्या. ठाण्यातील हाॅस्पिटलच्या दुर्घटनेवेळी त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली होती. आदिती या स्वकर्तृत्वावर पुढे आल्या आहेत. त्यांचा राष्ट्रवादीला अभिमान असल्याचे ते म्हणाले.