"गावठाण, कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 01:12 AM2020-10-04T01:12:29+5:302020-10-04T01:12:33+5:30
ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.
ठाणे : ठाण्यात राबविण्यात येत असलेली क्लस्टर योजना अद्यापही सुरू झालेली नाही. तीमधून गावठाणे-कोळीवाडे वगळले आहेत किंवा नाही, याबाबत अद्यापही अध्यादेश काढलेला नाही. यामुळे या योजनेच्या विशेष नियमावलीअंतर्गत नागरी पुनर्निर्माण आराखडा (यूआरपी) याबाबत सूचना/ हरकतींवर होणारी कोळीवाडा, गावठाण, पाडे येथील भूमिपुत्रांसह सर्व ठाणेकरांची सुनावणी रद्द करावी. तसेच जर गावठाण, कोळीवाडे, पाडे वगळले असतील, तर तसा शासन निर्णय आदेश तत्काळ काढावा, अशी मागणी ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या मागणीसाठी येथील भूमिपुत्रांनी मागील दीड वर्षापासून लढा उभारला असून त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळण्यात येतील, असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, आजपर्यंत त्याचे शासन निर्णय आदेशामध्ये रूपांतर झाले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. तसेच विधानसभा व विधान परिषद सभागृहांत जोपर्यंत गावठाण, कोळीवाडे यांचे विस्तारित सीमांकन होत नाही, तोपर्यंत क्लस्टर योजना तशाच विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही योजना राबवता येऊ नयेत व येणारदेखील नाहीत, त्याबाबत सखोल चर्चा होऊन आश्वासनही देण्यात आले आहे. परंतु, तरीदेखील क्लस्टर योजना जोरजबरदस्तीने रेटण्याचा अट्टहास का, असा सवाल समितीने केला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून आता आपण गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळले, असा शासन निर्णय लवकर काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवाय, ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव प्र.क्र. ५८६ मध्ये गावठाण, कोळीवाडे वगळण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असतानाही संबंधित अधिकारी गावठाण, कोळीवाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेबाबत सुनावणीसाठी का बोलावत आहेत, याचा जाब विचारून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.