वाढीव वीज बिलांचा लूटमार पॅटर्न रद्द करा: भाजपच्या आवाहनाला त्रस्त नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:51 AM2020-09-04T11:51:56+5:302020-09-04T11:52:24+5:30

राज्यव्यापी आंदोलनाचा शुभारंभ डोंबिवलीतून झाला असल्याचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

Cancel the increased electricity bills: Distressed citizens respond to BJP agitation | वाढीव वीज बिलांचा लूटमार पॅटर्न रद्द करा: भाजपच्या आवाहनाला त्रस्त नागरिकांचा प्रतिसाद

वाढीव वीज बिलांचा लूटमार पॅटर्न रद्द करा: भाजपच्या आवाहनाला त्रस्त नागरिकांचा प्रतिसाद

googlenewsNext

डोंबिवली: महावितरण कंपनीने राज्यात वीज ग्राहकांना वीजबिलांचा शॉक देण्याचे सत्र अद्याप चालूच आहे. महावितरणने कुठल्यातरी काल्पनिक गृहितकावर आधारित पाच पट वीजबिले ग्राहकांना पाठवली. कोरोना महामारीच्या काळात भाजपाने संयम राखून याबाबत अधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिले. लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. ही समस्या कल्याण डोंबिवली किंवा कोकणातली नसून हा गंभीर विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा वीज बिलांचा लूटमार पॅटर्न ठाकरे सरकारने राबवला असून तो तातडीने थांबवण्यासाठी भाजपच्या वतीने सर्वत्र शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन समस्या सोडवण्याचे आवाहन केले, त्याला शहरातील त्रस्त वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत झालीच पाहिजे झालीच पाहिजे वीज दरवाढ कमी झालीच पाहिजे, वीजबिल वाढ रद्द करा अशा घोषणा देत सहभाग घेतला.

राज्यव्यापी आंदोलनाचा शुभारंभ डोंबिवलीतून झाला असल्याचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले. डोंबिवलीत पूर्वेला बाजीप्रभू चौकात, महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी चव्हाण म्हणाले।की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 25 हजार पत्र डोंबिवलीतून पाठवण्याचे आवाहन।केले आहे. त्या पाठोपाठ उर्वरित ठाणे जिल्हा, कोकण भागातून पत्र पाठवावीत याची रचना लावण्यात आली आहे. उदासीन राज्य सरकार, लुटारू महावितरण कंपनी आणि ग्राहकहिताचं मुख्य उद्दिष्ट विसरलेला वीज आयोग यांनी एकत्रित येऊन ग्राहकांनाच ट्रॅप केले आहे. मात्र या वीज बिलांच्या विळख्यातून ग्राहकांना सोडवल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री ठाकरे हे समंजस आणि सूज्ञ आहेत असं भाजप समजत असल्याचे ते म्हणाले, पण त्यांना सर्वसामान्यांच्या वेदना का कळत नाहीत? वर्क फ्रॉम होम मुळे वीज बिले वाढली हा हास्यास्पद पवित्रा त्यांनी मागे घ्यावा आणि त्याबरोबर भरमसाठ वीजबिलेही तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यासाठी एक जागरूक वीज ग्राहक म्हणून प्रत्येकाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वीज बिले रद्द करण्यासाठी एक पत्र पाठवूया अशी हाक देताच हजारो डोंबिवलीकर रस्त्यावर येऊन पत्र देत आहेत याचाच अर्थ ते त्रस्त आहेत हे स्पष्ट आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी जो संघर्ष करावा लागेल त्यासाठी भाजप त्यांच्यासमवेत असेल असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Cancel the increased electricity bills: Distressed citizens respond to BJP agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.