भरमसाट वाढवलेली पाणीपट्टी रद्द करा; भाईंदर आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:58 PM2018-12-10T23:58:45+5:302018-12-10T23:58:58+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही.
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही. त्यामुळे शहरात उरल्यासुरल्या उद्योगांचे स्थलांतर होण्याची शक्यता असल्याने ते रोखण्यासाठी प्रशासनाने ते दर त्वरित रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टील उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पांडे यांनी पलिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे.
शहरातील स्टील उद्योग एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा उद्योग मानला जात होता. यातील अनेक व्यापाऱ्यांनी जकात, स्थानिक संस्था करासह पालिकेच्या विविध वसुलीला कंटाळून शहरातून स्थलांतर केले. उर्वरीत उद्योग आजही सुरू असुन त्यातील रोजगारामुळे शहरातील अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या उद्योगांत सुमारे १० हजारांहून अधिक लोक काम करतात. कारखानदारांना यंदाच्या महागाईच्या काळात उद्योग चालविणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे कामगारांचे वेतन वाढले असून उद्योग चालवण्याचे संकट उभे असताना पालिकेने वाढवलेल्या व्यावसायिक पाणीपट्टीचा दरही भरमसाठ असल्याचा दावा शैलेश यांनी केला आहे. पालिकेने तत्कालीन महासभेत पाणीपट्टीच्या दरवाढीचा सादर केलेल्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने मान्यता दिल्याचा आरोप शैलेश यांनी केला आहे.
पूर्वीच्या २० रुपये प्रती १ हजार लीटर व्यावसायिक पाणीपुरवठ्याचा दर तब्बल १५० टक्के वाढून तो थेट ५० रुपये प्रती १ हजार लीटर करण्यात आल्याने व्यापाºयांना भरमसाठ पाणीपट्टीची बिले वितरीत करण्यात आली आहेत. ही दरवाढ जाचक असून त्वरीत रद्द करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.