तिप्पट भाडेवसुली करणाऱ्या पार्किंग ठेकेदारांचा ठेका रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:55 AM2019-02-28T00:55:33+5:302019-02-28T00:55:41+5:30
ठामपाची कारवाई : २४ तासांत वाहनतळ रिकामा करण्याची नोटीस
ठाणे : नौपाड्यातील गावदेवी भाजी मंडईखाली असलेल्या पार्किंगचे तिप्पट दर आकारले जात असल्याचे ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याने या विभागाने संबंधित ठेकेदाराचा ठेका एकतर्फी रद्द केला असून २४ तासांच्या आत वाहनतळ रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. या ठेकेदाराने दुचाकीकरिता दररोज ३० रुपये भाडे आकारणे बंधनकारक असताना तो बेकायदा ९० रुपये वसूल करत होता.
ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या गावदेवी मंडईच्या तळघरातील वाहनतळाचे क्षेत्रफळ १०५१.४ चौरस मीटर असून सदर वाहनतळात ३०० च्या आसपास दुचाकी पार्क होत असतात.
हे वाहनतळ मे. रिटा मार्केटिंग या ठेकेदारास तीन वर्षांच्या कालावधीसाठी चालवण्यासाठी देण्यात आले होते. त्यापोटी त्याने पालिकेला दरमहा तीन लाख ५२ हजार रुपये देणे बंधनकारक होते. पालिकेने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे त्याने उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यांपूर्वी एका वाहनचालकाने पालिकेकडे ई-मेलद्वारे वाढीव भाडे आकारले जात असल्याची तक्रार केली होती. आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी या तक्रारीची आपल्या टीमद्वारे खातरजमा केल्यानंतर बुधवारी ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. हा ठेकेदार हा दुचाकीसाठी प्रतिदिन ३० रुपये आकारणे अपेक्षित असताना ९० रुपये आकारत होता. तसेच त्याची पावतीही दिली जात नव्हती.
याशिवाय, पार्किंगच्या ठिकाणी दरपत्रक लावणे अपेक्षित होते, तेसुद्धा केले नव्हते. सुरक्षारक्षक तैनात नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे न लावणे, अशा अनेक त्रुटी पाहणीत निदर्शनास आल्याची माहिती आस्थापना विभागाच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे. तसेच येथे ज्या फेरीवाल्यांचे सामान ठेवले जात होते, त्यांना बेकायदा भाडे आकारले जात असल्याचे उघड झाले आहे.
वाहनतळ रिकामे न केल्यास गुन्हा दाखल
या भागात जे फेरीवाले दिवसभर बसतात, त्यांचे साहित्य रात्रीच्या वेळेस याच ठिकाणी ठेवले जात होते व त्यांच्याकडून दररोज बेकायदा भाडे आकारले जात होते, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे आहेर यांनी सांगितले. आयुक्त संजीव जयस्वाल यांना अहवाल सादर झाला होता. ठेका रद्द करण्यात आल्याने येत्या २४ तासांत वाहनतळ रिकामे करण्यास ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. परंतु, त्याने तसे न केल्यास ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.