मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:42 AM2020-01-23T01:42:10+5:302020-01-23T01:42:44+5:30
मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसिना अजीज (बाटा) यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे : मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसिना अजीज (बाटा) यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ एकने कमी झाले आहे.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्र मांक ३० हा इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव होता. त्या जागेवर हसिना अजीज (बाटा) या राष्ट्रवादीच्या तिकिटावर भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जातप्रमाणपत्राला प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेऊन त्याबाबत दावा दाखल केला होता. न्यायालयाने नाशिक विभागातील जातपडताळणी विभागाला जातप्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचे आदेश दिले होते. नाशिक जातपडताळणी विभागाने ४ जानेवारी रोजी त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याचे ठामपाला कळवल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हसिना अजीज यांचे सदस्यत्व रद्द करून तसे २० जानेवारी रोजी त्यांना कळवले आहे.
ठामपात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ३५ आहे. हसिना यांचे सदस्यत्व रद्द केल्याने त्यांची संख्या एकने कमी झाली आहे. मुंब्य्रातील आणखी एका राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या जातप्रमाणपत्राचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याबाबतही लवकरच निकाल अपेक्षित असल्याचे मुंब्य्रातील एका माजी नगरसेवकाने सांगितले.