कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 05:50 AM2019-01-06T05:50:24+5:302019-01-06T05:50:41+5:30

मार्केट घोटाळा : मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

Cancellation of old tender for contractual-liable people | कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बीओटीवरील तात्पुरत्या मार्केटचे कंत्राट देताना पालिकेने मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळणार नाही, म्हणून आधीची निविदा रद्द केली. त्या निविदेतील प्रतिस्पर्धी कंत्राटदारांची कागदपत्रे पाहून नव्याने निविदा काढताना त्यात वाढीव अटी घालून केवळ त्या मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळेल, अशी तजवीज पालिकेने केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. यातून स्पर्धा होऊ न देता पालिकेचे उत्पन्नही बुडण्याची शक्यता आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेतील बाजार शुल्कवसुली करणारे कंत्राटदार सत्ताधारी भाजपाच्या मर्जीतील असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. सत्ताधाऱ्यांचीही कंत्राटदारांना आर्थिक फायदा पोहोचवण्याची धडपड सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतही भाजपाने कंत्राटदारांना मुदतवाढीसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. विशेष म्हणजे खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच नवीन निविदा काढू नका, म्हणून पत्र दिले होते.

शहर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेने तात्पुरते मार्केट बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू करण्याचे आराखडे तयार केले. त्यातही गेल्या वर्षी २६ मार्चला काढलेली बीओटीची निविदा विजय सोमानी या कंत्राटदारास दिली. त्याला ११ बीओटी मार्केटचे पाच वर्षांसाठी कंत्राट दिले. हाटकेश उद्योगनगर नाला, मॅक्सस मॉलमागील स्थानिक संस्थाकर कार्यालय, आशानगर, इंद्रलोक, सिल्व्हर पार्क, सेंट झेवियर्स शाळा यांचा समावेश आहे. त्यातील रामदेव पार्क व हाटकेश भागातील मार्केट सुरू झाली आहेत. आधीच्या ११ मार्केटचे कंत्राट सोमानी या कंत्राटदारास मिळाले असताना त्यानंतर पालिकेने निविदा सूचना प्रसिद्ध करून शांतीनगर आरजी जागा, सुभाषनगर, जेसल पार्क मलनि:सारण केंद्र, गोडदेव स्मशानभूमी नाला, नवघर, श्यामराव विठ्ठल बँक व सिल्व्हर सरिता येथे बीओटी तत्त्वावर मार्केट विकसित करण्याची निविदा काढली होती. परंतु, निविदेत स्पर्धा झाल्याने प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राट मिळावे, म्हणून निविदाच रद्द केली.

पालिकेने डिसेंबरमध्ये निविदा प्रसिद्ध करून त्यात विशिष्ट ठिकाणे न देता पालिका वेळोवेळी निश्चित केलेल्या जागेवर बीओटीची मार्केट विकसित करण्यासाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा काढली. ती काढताना आधी काढलेल्या निविदेतील अटी काढून मर्जीतील कंत्राटदारांना फायद्यासाठी अटी टाकण्यात आल्या. पूर्वीच्या निविदेत पाच अटी होत्या. नव्या निविदेत आठ अटी आहेत. बीओटीवरील मार्केट चालवण्याचा अनुभव बंधनकारक करून अन्य कंत्राटदारांचे मार्गच बंद केले आहेत.

असे आहे बीओटी मार्केट

परिसरातील फेरीवाल्यांना या तात्पुरत्या मार्केटमध्ये सामावून घेताना कंत्राटदार हा छप्पर, कुंपण, कोबा, वीज, पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षा पुरवणार आहे. त्या बदल्यात तो फेरीवाल्यांकडून किमान ८० रुपये रोज शुल्क वसूल करेल. पालिकेला वार्षिक नाममात्र भाडे देणार आहे.

याची माहिती आपण घेतो. फाइल पाहून त्यात जर अनावश्यक बदल झाला असेल, तर सुधारणा करून घेऊ.
- दीपक खांबित,
कार्यकारी अभियंता
 

Web Title: Cancellation of old tender for contractual-liable people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.