कोरोना व्हायरसमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील स्वागत यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 06:37 PM2020-03-13T18:37:08+5:302020-03-13T18:37:55+5:30
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात.
ठाणे : मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रांवर यंदा ‘करोना’चे सावट असून याच पाश्र्वाभूमीवर शुक्रवारी आयोजिक केलेल्या बैठकीमध्ये स्वागत यात्रा काढू नका, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्वच आयोजकांना केले. त्यास आयोजकांनी प्रतिसाद देत यंदाच्या स्वागत यात्रा रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. तसेच उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंद यात्राही रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी बैठकीमध्ये घेतला असून त्याचबरोबर नवी मुंबईतील क्रीकेट सामना पाहण्यासाठी काढलेल्या तिकीटाचे पैसे संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बैठकीत जाहीर केले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि इतर भागांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठ्या स्वागत यात्रा निघतात. त्यामध्ये शहरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वचजण मोठ्या संख्येने सहभागी होतात. या यात्रांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्यात येतो. मात्र, जगभरात फोफावत असलेल्या करोना विषाणुचा शिरकाव राज्यासह ठाण्यातही झाला असून या विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रांवर करोनाचे सावट असल्याचे चित्र होते. तसेच यंदाच्या स्वागत यात्रा होणार की नाही, अशी चर्चा शहरात सुरु झाली होती. असे असतानाच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच स्वागत यात्रा आयोजकांची तातडीची बैठक बोलविली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच स्वागत यात्रांचे आयोजक आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी करोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांर्भीय सर्वांसमोर मांडले. तसेच ठाण्यात ही कोरोनाचा रुग्ण आढळला असून या आजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले असून त्याचबरोबर ग्रंथोत्सवही रद्द केला आहे. त्यामुळे स्वागत यात्रा बाबतही असाच निर्णय घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले. त्यास प्रतिसाद देत आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पुर्वची स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर सर्वच संस्थांनीही अशाचप्रकारे स्वागत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पुढील वर्षी स्वागत यात्रांना परवानगी घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे पोलिस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. तर काही आयोजकांनी दिपोत्सवाला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, दिपोत्सवही करू नका, असे आवाहन नार्वेकर यांनी केले. त्यासही आयोजकांनी दिपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई येथील क्रिडा प्रेक्षागृहामध्ये रस्ता सुरक्षा अंतर्गत क्रीकेट सामना होणार आहे. मात्र, तो पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. या सामान्याकरिता काढलेल्या तिकीटाचे पैसे संबंधितांना परत दिले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंद यात्राही रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी बैठकीमध्ये घेतला. ठाण्यातील राबोडी भागातील दीपोत्सव आणि शोभा यात्रा रद्द करण्याचा निर्णय नगरसेवक सुहास देसाई यांनी बैठकीत जाहीर केला. तसेच कुटूंबासोबत गुढी पाडवा साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मॉल आणि सहल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. परदेशात जाणाºया पर्यटकांची माहिती द्याावी. जेणेकरून तशा उपाययोजना करणे सोयीचे होईल, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सहल कंपन्यांच्या प्रतिनिधींना केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यायामशाळा, नाट्यगृह, चित्रपटगृह, जल तरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले असून त्याचे पालन करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटिल यांनी संबंधितांना दिल्या. तसेच मॉलमध्ये साफसफाई करा आणि स्वच्छता ठेवा, सॅनिटायझर ठेवा, घरपोच सेवा वाढविण्यावर भर द्याा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच सिनेमासाठी तिकीट विक्री केली असेल तर त्याचे पैसे परत करा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.