निष्ठावंत ब्राह्मण कार्यकर्त्याला उमेदवारी द्या; संख्याबळ असूनही डावलत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:10 AM2019-09-11T00:10:11+5:302019-09-11T00:10:35+5:30
भाजपतर्फे काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या
मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात जवळपास ५० हजार ब्राह्मण मतदारांची संख्या आहे, तर डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या किमान एक लाख आहे. या दोन्ही मतदारसंघातून रामभाऊ कापसे यांचा अपवाद वगळता भाजपने ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेली नाही. या दोन्ही मतदारसंघातून ब्राह्मण समाजातील सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याचा निवडणुकीसाठी विचार करावा, अशी मागणी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुक महेश जोशी यांनी केली.
भाजपतर्फे काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी कल्याण पश्चिमेतून १० उमेदवार इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार हे आहेत. जोशी हे भाजपचे काम १९८५ पासून करीत आहे.
पक्षातील एक जुना कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेतील परिवहन समितीच्या सदस्यपदी त्यांना काम करण्याची संधी पक्षाने दिली होती. जोशी म्हणतात की, रामभाऊ कापसे यांना कल्याण मतदारसंघातून उमेदवारी दिली होती व त्यांनी खूप चांगले काम केले. त्यावेळी कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले नव्हते.
कापसे यांच्यानंतर आजतागायत ब्राह्मण कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिली नाही. आरक्षित असलेल्या महिला, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवारांना उभे राहता येत नाही. मात्र खुल्या वर्गासाठी असलेल्या मतदारसंघातूनही पक्षाकडून इतर मागासवर्गीय उमेदवारालाच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे खुल्या वर्गातील ब्राह्मण समाजावर अन्याय केला जातो. कल्याण पश्चिम हा खुल्या प्रवर्गासाठीचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ब्राह्मण समाजातील उमेदवाराचाच विचार होणे अपेक्षित आहे. कल्याणपेक्षा जास्त ब्राह्मण मतदार हे डोंबिवलीत आहेत. त्याठिकाणीही ब्राह्मण उमेदवाराचा विचार केला जात नाही. महापालिका निवडणुकीतही मोजक्या ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी दिली गेली असल्याकडे जोशी यांनी लक्ष वेधले आहे.
ज्यावेळी पक्षाचे दोन खासदार होेते. तेव्हा ब्राह्मण समाजाने पक्षाला समर्थन दिले होते. आता पक्षाचे ३०० खासदार असतानाही ब्राह्मण समाज पक्षाच्या पाठीशी आहे. दोन खासदार असतानाही ज्यांनी पक्षाला साथ दिली त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजच्या घडीला नगण्य ठरले आहे, अशा शब्दांत जोशी यांनी नाराजी प्रकट केली.
पक्षात भरमसाट इनकमिंग सुरु आहे. त्याला ‘भाजपची भरती’ असे नाव देऊन विरोधकांकडून टीका केली जात आहे. आज भाजपची जी हवा तयार झाली आहे ती आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नातून तयार झालेली आहे. त्यामुळे आता अन्य पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत. त्यांना आमचा विरोध नाही. पण त्यांना भाजपच्या तत्त्वांशी काही एक देणेघेणे नाही. त्यांना केवळ त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
त्यामुळे सध्या पक्षाची स्थिती ही थंडी वाजू लागल्याने तंबूत शिरलेल्या उंटासारखी झाली आहे. भाजपच्या तंबूत बाहेरचे उंट घुसल्याने जुना कार्यकर्ता तंबूबाहेर फेकला गेला आहे, असे जोशी म्हणाले. आमच्यासारख्या सामान्य ब्राह्मण कार्यकर्त्याने झेंडे लावण्याचेच काम करायचे का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपचे संघटनप्रमुख सतीश धोंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.