उमेदवारांना प्रचार खर्च द्यावा लागतोय ट्रू व्होटर ॲपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 11:57 PM2021-01-09T23:57:59+5:302021-01-09T23:58:17+5:30
आधीच्या निवडणूक खर्चाचा हिशोब न दिलेला उमेदवार सध्याच्या निवडणुकीला अपात्र ठरविल्याची आफत बहुतांशी उमेदवारांवर ओढावली आहे. त्यास आपणही बळी पडू नये, यासाठी उमेदवार निश्चित केलेल्या खर्चाच्या मर्यादेत आपला खर्च जपून करीत आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यांचा प्रचार रंगात आला आहे. मात्र, या प्रचारासाठी रोज लागणाऱ्या खर्चाची नोंद आता निवडणूक कार्यालयात जाऊन द्यावी लागणार नाही. प्रचार करताना, मतदारसंघात उमेदवार बसलेले असताना, त्यांच्या खर्चाची नोंद त्यांना आता रोज ‘ट्रू व्होटर’ या ॲपवर आता देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आधीच्या निवडणूक खर्चाचा हिशोब न दिलेला उमेदवार सध्याच्या निवडणुकीला अपात्र ठरविल्याची आफत बहुतांशी उमेदवारांवर ओढावली आहे. त्यास आपणही बळी पडू नये, यासाठी उमेदवार निश्चित केलेल्या खर्चाच्या मर्यादेत आपला खर्च जपून करीत आहे. याशिवाय झालेल्या खर्चाची नोंद ठेवून प्रतिनिधीमार्फत रोज निवडणूक शाखेला नोंद करण्यासाठी सज्ज आहे, पण या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने ॲपद्वारे खर्चाची नोंद करण्याची संधी उमेदवारास उपलब्ध करून दिली आहे. यामुळे उमेदवाराला वेळेची बचत करून प्रचाराकडे अधिक लक्ष देऊन जादा मतदारांच्या भेटी घेता येतील.
या ट्रू व्होटर ॲपचे प्रशिक्षण जिल्हा निवडणूक शाखा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. आता तालुका पातळीवरील अधिकारी जिल्ह्यातील या दोन हजार २३१ उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना ॲपद्वारे ऑनलाइन खर्च नोंदण्याची संधी देत आहे. जिल्ह्यात सात सदस्य असलेल्या ४६ ग्रामपंचायतीं असून, ७४ ग्रा. पं. नऊ सदस्य संख्येच्या आहेत. या सदस्यांना २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा आहे, तर ११ ते १३ सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतींसाठी ३५ हजार रुपये खर्च मर्यादा आहेत. यामध्ये जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती आहेत. १५ ते १७ सदस्यसंख्येसाठी ५० हजारांची खर्च मर्यादा आहे. यामध्ये दहा ग्रामपंचायती जिल्ह्याभरात आहेत. या खर्च मर्यादेतच जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतीच्या या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा ताळेबंद आता ॲपद्वारे देणे बंधनकारक
केले आहे.