उमेदवार सुटीवर अन् कार्यकर्ते रुग्णशय्येवर, पक्षाकडून साधी विचारपूसही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:26 AM2019-05-02T01:26:26+5:302019-05-02T06:16:36+5:30
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून उमेदवार आता विजयाची गणिते मांडत सुटी एन्जॉय करत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रचारासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून पायातील चपला झिजवणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आजारी पडला आहे.
अजित मांडके
ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून उमेदवार आता विजयाची गणिते मांडत सुटी एन्जॉय करत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रचारासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून पायातील चपला झिजवणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आजारी पडला आहे. डॉक्टरांकडे जाऊन तो औषधोपचार घेत आहे; मात्र निवडणुकीत वारंवार फोन करून प्रचाराला ये म्हणून सांगणाऱ्या उमेदवारासह त्यांचे प्रतिनिधी आता या कार्यकर्त्यांची साधी विचारपूसही करत नसल्याची क्लेशदायक बाब समोर आली आहे.
९ एप्रिलला विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तेव्हापासूनच सर्वसामान्य कार्यकर्ता तन, मन आणि धनाने आपल्या उमेदवारांसाठी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन उन्हातान्हात फिरू लागला. आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना त्याने काळवेळ अजिबात बघितली नाही. आपल्या उमेदवाराला कसे निवडून आणता येईल, यासाठीच दिवसरात्र तो झटताना दिसत होता. यासाठी त्याने घरच्यांचेसुद्धा बोलणे खाल्ले आहे. ठाण्यातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची आई घरी आजारी असतानाही त्याने आपला वेळ हा केवळ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाहून घेतल्याचे समोर आले आहे. परंतु, घरच्यांचा ओरडा खाऊन, कामाचे खाडे करून हा सर्वसामान्य कार्यकर्ता उन्हातान्हाची पर्वा न करता प्रचार करताना दिसत होता. ठाण्यात सध्या सूर्य आग ओकत आहे. मागील काही दिवसांपासून ठाण्याचे तापमान हे ३५ ते ४० अंशापर्यंत गेले आहे. परंतु, तीव्र उन्हाचीही पर्वा न करता कार्यकर्ता प्रचाराची लगीनघाई करताना दिसत होता. जणू काही स्वत:च्याच घरी लग्न असल्यासारखी तयारी तो जोमाने करत होता.
कधी आवाज कोणाचा, निवडून-निवडून येणार कोण, तर कधी आपल्या पक्षाच्या घोषणा देत होता. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा घसा बसला असून, त्यांना घशाचे विकार, पायदुखी, कंबरदुखी, ताप, जुलाब, चक्कर येणे, उन्हाचा त्रास असह्य होणे, असे आजार जडले आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवार गाडीतून फिरत असताना हाच सर्वसामान्य कार्यकर्ता उन्हाची तमा न बाळगता रोज ८ ते १० किमी पायी चालत होता. कधी इमारतीचे पाच ते सात मजले चढणे, कधी झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येक घरात जाऊन उमेदवाराचा प्रचार करणे, असे पायाला भिंगरी बांधल्यासारखे काम या कार्यकर्त्यांकडून होत होते. त्यामुळे अशक्तपणाचा त्रास, रक्तदाब वाढणे, असे आजार या कार्यकर्त्यांला बळावू लागले आहेत. परंतु, जे काही केले ते आपल्या उमेदवारासाठीच केले, असे म्हणून हा आजारही उडवून लावण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
आता निवडणुकीचा प्रचार संपला असून उमेदवार सुटी एन्जॉय करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. परंतु, सर्वसामान्य कार्यकर्ते खिशातील पैसे टाकून डॉक्टरांकडे उपचारासाठी जात आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी काही वेळेस कामावर जाणे, दांडी मारणे असा दिनक्रम कार्यकर्त्यांचा सुरू होता. आता मात्र निवडणूक संपल्यानंतरही केवळ आजारपणामुळे या कार्यकर्त्याला पुढील चार ते पाच दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा कामाचे खाडे होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये मात्र याबाबत तीव्र नाराजी आहे. त्यातच, प्रचाराचा धुराळा आता संपला असल्याने आपली साधी विचारपूसही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून होत नसल्याची खंत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
मागील १५ दिवस निवडणुकीचा प्रचार सुरू होता. त्यामुळे प्रचंड धावपळ होती. या दिवसांत काळवेळ न बघता केलेल्या श्रमामुळे आता शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. - मिहार नलावडे, कार्यकर्ता
कामधंदा सोडून, नको ते उद्योग करू नको, असे बजावले होते. उन्हाचा त्रास होईल, आजारी पडशील, असेही सांगितले होते. मात्र, मुलाने ऐकले नाही. आता कोणी विचारपूसही करीत नाही. - रमेश नलावडे, कार्यकर्त्याचे वडील
निवडणुकीत प्रचार करणे, हे कार्यकर्त्याचे कर्तव्य असते. प्रत्येक निवडणुकीत त्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागते. उन्हाचा पारा वाढल्यानेच कार्यकर्त्यांना त्रास झाला. रॅली, मतदारांना बाहेर काढणे, जिने चढउतार करणे, यामुळेही नक्कीच त्रास झाला आहे. परंतु, पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. - हेमंत वाणी, एका पक्षाचे पदाधिकारी
प्रचार करताना काही वाटले नाही. परंतु, आता पाय दुखणे, रक्तदाब वाढणे असे त्रास होत असून डॉक्टरांनी पुढील पाच ते सहा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. - निलेश रसाळ, कार्यकर्ता
वाढत्या उन्हामुळे होऊ शकणाºया त्रासाची माहिती न घेतल्यानेच अशा प्रकारचे आजार बळावले आहेत. त्यामुळे अशांना आम्ही आरामाचा सल्ला देत आहोत. आताही अशा रुग्णांनी जास्तीतजास्त पाणी पिणे, उन्हात फिरणे टाळावे, असे सल्लेही देत आहोत. - डॉ. दिशा सहाय्य