शेवटच्या वीकेण्डला उमेदवारांनी लावला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:39 AM2019-04-22T02:39:47+5:302019-04-22T02:40:42+5:30
ठाणे, कल्याण, भिवंडीचा प्रचार अंतिम टप्प्यात; चौकसभा, एलईडीद्वारे प्रचार, भेटीगाठींवर दिला अधिक भर
मतदारांमध्ये नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. एरव्ही, हा मतदारवर्ग सहजासहजी सापडत नाही. दिवस निघाला की, कामाला निघालेली ही मंडळी रात्री उशिरा घरी पोहोचतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेल्या शेवटच्या रविवारी उमेदवारांनी चांगलाच जोर लावला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांच्या प्रमुख उमेदवारांनी नोकरदारांना मतांचा जोगवा मागण्यासाठी रॅलींचे आयोजन केले होते. याशिवाय, ठिकठिकाणी सभा घेत, घरोघरी जाऊनही नोकरदारांच्या भेटीगाठी घेतल्या.
ठाण्यात सभांवर भर
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी मिळालेल्या शेवटच्या रविवारी शिवसेना आणि राष्टÑवादीच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलाच जोर लावला. मॉर्निंग वॉकपासून ते रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र ठाण्यात सुरू होते. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादीचे आनंद परांजपे या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यात सोशल मीडियावर अधिक भर दिला. त्यासोबतच रॅली, प्रचारसभा आदींसह कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या; मात्र रविवारी सुटीच्या दिवसाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून आले. आठवडाभर कामाला जाणारा चाकरमानी हा सुटीच्या दिवशी घरी सापडतो, म्हणून त्याला हेरण्यासाठी आणि त्याचे मतपरिवर्तन करण्यासाठी रविवारी प्रचारावर भर देण्यात आला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मतदारांच्या भेटीगाठीसाठी उमेदवारांनी सकाळी ६ वाजल्यापासूनच प्रचार करण्यास सुरुवात केली. बरं, उमेदवार राहणारा ठाण्यातला आणि मॉर्निंग वॉक करायला मीरा-भार्इंदर, नवी मुंबईमध्ये कसा, असा प्रश्न नियमित वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना सतावत होता. याशिवाय रेल्वेस्टेशन, वेगवेगळ्या भागांत रॅली आणि गल्लीबोळांसह झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचून उमेदवारांनी मतांचा जोगवा मागितला. शिवसेना कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून प्रचारावर भर दिला.
बाबाजी पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचार
कल्याण : प्रचाराच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी कल्याण पूर्वेसह ग्रामीण भागात प्रचार केला. दुसरीकडे, आजीच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडलेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीणसह पूर्व विधानसभा मतदारसंघात बाइक रॅली काढून प्रचार केला. बाबाजी पाटील यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रचार केला.
मलंगपट्ट्यातील २८ गावांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. प्रचाराचा रथ आणि वाहनांच्या ताफ्यासह सुरू असलेल्या या प्रचारात सायंकाळी ६ च्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हेदेखील सहभागी झाले. नाईक यांच्यासोबत रात्री ९ वाजेपर्यंत ग्रामस्थांशी भेठीगाठी सुरू होत्या. रविवारी पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये प्रचार केला.
प्रामुख्याने २७ गावांमध्ये केलेला हा प्रचार रात्री साडेआठपर्यंत सुरू होता. श्रीकांत शिंदे यांनी दुपारी ४ वाजता कल्याण पूर्वेकडील भागात प्रचारफेरी काढली. यावेळी युतीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते बाइक घेऊन सहभागी झाले होते. १०० फुटी रोड मलंग रोडपासून सुरुवात होऊन कल्याण पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालय परिसरात रॅलीची सांगता झाली.
भिवंडी उमेदवारांनी
मतदारांशी साधला संपर्क
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी शनिवारी आणि रविवारी नोकरदारवर्गासह इतर मतदारांशी संपर्क साधला. दोन दिवसांत त्यांनी शहरासह ग्रामीण भागासही भेटी दिल्या. भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी शनिवारी बदलापूरच्या ग्रामीण व शहरी भागांतील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. नोकरदारांसह इतर मतदारांनाही आवाहन करण्यासाठी पाटील यांनी काढलेल्या प्रचार रॅलीत भाजप-शिवसेना-रिपाइं पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कल्याण पश्चिम परिसरातील विविध भागांतही महायुतीने प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार नरेंद्र पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरु वात झाली. मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या खासदारांनी जाणून घेतल्या. आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी शनिवारी रात्री वंजारपाटीनाका, खंडूपाडा या भागांत मतदारांशी संपर्क साधला. त्यांनी रविवारी शेलार मीठपाडा येथून रॅलीला सुरुवात केली. काटई, कांबे व तळवलीनाका येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. जूनांदुर्खी येथील काशिनाथ टावरे हायस्कूल येथे त्यांनी छोटी सभा घेतली. पुढे चिंबीपाडा, लाखिवलीमार्गे खारबाव येथे ही रॅली पोहोचली. दुपारनंतर ही रॅली महामार्गावरून ग्रामीण भागातून फिरून माणकोलीमार्गे कोम गावापर्यंत पोहोचली.