चपलांसाठी ‘तो’ वाटतोय उमेदवाराची पत्रके
By admin | Published: February 14, 2017 03:00 AM2017-02-14T03:00:28+5:302017-02-14T03:00:28+5:30
विवेक शिवराज चव्हाण... वय अवघे आठ वर्षे... वर्तकनगर येथील महापालिका शाळेतील दुसरीच्या वर्गातील हा विद्यार्थी... निवडणूक प्रचारातील
जितेंद्र कालेकर / ठाणे
विवेक शिवराज चव्हाण... वय अवघे आठ वर्षे... वर्तकनगर येथील महापालिका शाळेतील दुसरीच्या वर्गातील हा विद्यार्थी... निवडणूक प्रचारातील अनेक कार्यकर्त्यांपैकी हाही एक धडाडीचा छोटा कार्यकर्ता... वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मधील एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराची पत्रके वाटत तो सध्या फिरत आहे... निवडणूक झाल्यावर त्याला नवी कोरी चप्पल घेऊन देण्याचे आश्वासन उमेदवाराने दिले आहे.
सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास साईबाबा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये विवेक पत्रके वाटत होता. समोर येणाऱ्यांच्या हातात उमेदवाराचे पत्रक टेकवतानाच ‘आपल्या उमेदवारावर निवडणुकीत तेवढे लक्ष ठेवा’ असे तो आवर्जून सांगत होता. घाईगर्दीत असलेल्या विवेकला थांबवून त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रस्तुत प्रतिनिधीने प्रयत्न केला.
विवेक म्हणाला की, तो भीमनगर भागात वास्तव्याला असून आई घरोघरी धुणीभांड्यांची कामे करते तर वडील मिस्त्रीचे काम करतात. आणखी किती दिवस पत्रके वाटणार, असे विचारले असता आणखी पाच ते सहा दिवस पत्रके वाटायची आहेत, असे तो बोलला. पत्रके वाटून काय मिळणार, असा सवाल केला असता नवी कोरी चप्पल मिळेल, असे तितक्याच निरागसतेने त्याने उत्तर दिले. फक्त चप्पल मिळण्यासाठी पत्रक वाटणार का, असे विचारल्यावर तसे नाही... साहेब, बोलले तुला पाहिजे ते देईन. पण, चप्पल नक्की मिळणार. मग, तू काय मागणार, असे विचारल्यावर विवेकची कळी खुलली. किंचित लाजून... आढेवेढे घेत तो म्हणाला की, मी गिअरची सायकल मागणार. साहेब, मला नक्की सायकल देतील. खूप घाईत असल्याचे सांगून प्रचारासाठी फिरणाऱ्या घोळक्याला शोधत त्याच लगबगीने तो निघूनही गेला.
राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते व उमेदवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अनेक उमेदवार लहान मुलांची प्रचाराकरिता मदत घेतात. मोठ्या सोसायट्या, कॉम्प्लेक्स येथे तरुण गेले तर सोसायटीचे वॉचमन, सिक्युरिटी गार्ड त्यांना आत सोडत नाहीत. हाकलून लावतात. उमेदवाराची पत्रके लोकांपर्यंत जाण्याकरिता लहान मुलांवर जबाबदारी टाकली, तर ते कसेही करून पत्रके पोहोचवतात. लहान मुलाने दिलेले पत्रक कुणीही स्वीकारतो, लागलीच फेकून देत नाही. पुस्तके, शालेय वस्तू, एक पॅण्ट-शर्ट, बॅट-बॉल अशी बक्षिसे देण्याचे आमिष दाखवून लहान मुलांची निवडणुकीत मदत घेतली जात आहे.